बेळगाव लाईव्ह:राज्यात शाळा -महाविद्यालयांच्या आसपास तंबाखूजन्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आल्यानंतर आता धर्मादाय खात्याच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांच्या परिसरापासून 100 मीटरपर्यंत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिराच्या 100 मीटर परिसरात असणाऱ्या दुकानांमधून तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री केली जात आहे. त्यामुळे भक्तांना त्रास सोसावं लागत असून मंदिराचे पावित्र्य नष्ट होत आहे. याची गांभीर्याने दखल घेत मंदिरापासून 100 मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घातले जाणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी (यल्लमा) मंदिर, रायबागचे चिंचली श्री मायाक्का मंदिर, बडकुंद्री हुक्केरीचे श्री होळेम्मा मंदिर यासह
बेळगाव शहरातील दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिर, श्री कलावती मंदिर (हरी मंदिर), समादेवी गल्लीचे श्री समादेवी मंदिर, टिळकवाडीतील श्री साई मंदिर आणि बाळेकुंद्रे येथील पंत
देवस्थानाच्या आवारापासून 100 मीटरपर्यंतच्या परिसरात उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. लवकरच तसा आदेश जारी होणारा असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.