बेळगाव लाईव्ह :कारखाना चालवणे सोपी गोष्ट राहिलेली नाही. आम्ही शेतकर्यांच्या जोरावर हा कारखाना यशस्वी चालवत आहोत. शेतकर्यांनी आम्हाला चांगला ऊस पुरवठा केला तर कारखान्याला चांगले दिवस येणार आहेत असे मत मार्कंडेय साखर कारखाने विद्यमान उपाध्यक्ष आर आय पाटील यांनी व्यक्त केले.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा सोमवारी काकती येथील कारखान्यावर झाली. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष अविनाश पोतदार होते त्यावेळी नूतन उपाध्यक्ष या नात्याने आर आय पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना आर आय पाटील म्हणाले काही दिवसांपूर्वी कारखान्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या काही माणसांनी कारखान्याची पाहणी केली आहे. हा कारखाना अधिक जोमाने चालवण्यासाठी मदत करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे आता आम्हा सर्वांची जबाबदारी वाढली आहे. स्थानिक शेतकर्यांनी ऊसपुरवठा करणे आवश्यक आहे. आगामी काळात वीज उत्पादन, इथेनॉल प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यामुळे या कारखान्याला शेतकर्यांची गरज आहे.
मावळते अध्यक्ष अविनाश पोतदार म्हणाले की मार्कंडेय साखर कारखाना सुरू व्हावा, हे अनेकांचे स्वप्न होते. त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. आज तीन हंगाम यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत. अनेक अडचणी आल्या तरी शेतकर्यांच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही गळीत हंगाम यशस्वी केले आहेत.
शेतकर्यांचा हा कारखाना शेतकर्यांच्या पुढाकाराने चालणार आहे. आम्ही सर्व कारखान्यांच्या बरोबरीने उसाला दर दिला आहे.यासाठी शेतकर्यांनी अधिकाधीक ऊस पुरवठा करणे आवश्यक आहे. यंदाचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल.
व्यवस्थापकीय संचालक एस. एस. पुजारी यांनी ठरावांचे वाचन केले. त्याला मंजुरी देण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अविनाश पोतदार आणि आर. आय. पाटील यांनी सभासदांच्या शंकांचे निरसन करत समाधान केले.
व्यासपीठावर मनोहर हुक्केरीकर, भरत शानभाग, बाबुराव पिंगट, चेतक कांबळे, भाऊराव पाटील, बाबासाहेब भेकणे, सुनील अष्टेकर, मनोहर होनगेकर, वसुधा म्हाळोजी, वनिता अगसगेकर, बसवंत मायाण्णा, लक्ष्मण नाईक, बसवराज गाणीगेर, शिवाजी कुट्रे, सिद्दाप्पा टुमरी आदी उपस्थित होते.