बेळगाव लाईव्ह: बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी 7 किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटापेक्षा जास्त काळ थांबणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग शुल्क आकारले जाते. तथापि येथील पार्किंगची व्यवस्था पाहणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडून वाहन चालकांकडून सर्रास पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत आज पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला चांगली समज दिली असून विमानतळ प्रशासनाने देखील योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी वाहने थांबविण्यासाठी पार्किंगची प्रशस्त सोय आहे. या ठिकाणी 10 मिनिटात पेक्षा अधिक काळ वाहन थांबविल्यास पार्किंग शुल्क आकारले जाते. बस/कोच/ट्रक या वाहनांसाठी 20 ते 50 रुपये, टेम्पो/मिनीबस वगैरे वाहनांसाठी 20 ते 35 रुपये, कार/ऑटोरिक्षा यांच्यासाठी 20 ते 35 रुपये तर दुचाकी वाहनांसाठी 10 ते 15 रुपये असे येथील पार्किंगचे दर आहेत. त्यानुसार वाहन चालकांकडून पार्किंग शुल्क आकारले जाते. याव्यतिरिक्त प्रवाशांना सोडण्यासाठी अथवा घेऊन जाण्यासाठी आलेल्या आणि 10 मिनिटाच्या आत लगेच माघारी फिरणाऱ्या वाहन चालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र अलीकडे विमानतळाच्या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकाकडून विमानतळ आवारात अत्यंत अल्पावधीसाठी वाहने थांबवणाऱ्या वाहन चालकांकडून पार्किंग शुल्कच्या नावाखाली पैशाची लूट सुरू होता. याचा अनुभव आज बुधवारी आपली कार घेऊन बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी गेलेल्या विनयकुमार नामक प्रतिष्ठित व्यक्तीस आला. विमानतळाकडे गेलेले विनयकुमार अवघ्या 7 मिनिटाच्या आत तिथून निघाले होते. मात्र तरीही संबंधित कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून 20 रुपये पार्किंग शुल्क उकळले. त्यामुळे संतप्त झालेल्या विनयकुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सदर प्रकाराला आळा घालण्याची तसेच त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. एवढ्यावर न थांबता त्यांनी सोशल मीडियावर सदर प्रकाराचा निषेध करत संबंधित कर्मचाऱ्यांचा फोटो प्रसिद्ध करून त्याच्यापासून सावध राहण्याचा इशारा शहरातील इतर वाहन चालकांना दिला.
दरम्यान, सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नवे पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) रोहन जगदीश यांनी आपल्या एका पोलिस अधिकाऱ्याला तात्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी करण्यास सांगितले. तसेच संबंधित प्रकार विमानतळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. वाहन चालकांकडून पैसे उकळणाऱ्या कर्मचाऱ्यास पोलीस अधिकाऱ्यांनी चांगली समज दिली असून विमानतळ प्रशासनाने देखील या प्रकरणी लक्ष घालून समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे. सदरची माहिती खुद्द पोलीस उपायुक्तांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून फोटोसह प्रसिद्धस दिली आहे.