बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील पायोनियर अर्बन बँकेची 117 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी बँकेच्या भिमराव पोतदार सभागृहात संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षा स्थानी बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर हे होते तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील यांच्यासह बाकीचे सर्व संचालक सहभागी होते बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मूल्या यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले त्यानंतर चेअरमन आणि उपस्थित वरिष्ठ सभासदांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून सभेला प्रारंभ करण्यात आला.
अहवाल सालात दिवंगत झालेल्या बँकेच्या सभासदांना एक मिनिट थांबून श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील वर्षाच्या सभेचे इतिवृत्त सीईओ अनिता मूल्या यांनी वाचून दाखवले. त्यानंतर चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की”पायोनियर बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 7 लाख 87 हजाराचा ढोबळ नफा झाला असून 1 कोटी 55 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला आहे.बँकेच्या इतिहासात प्रथमच एवढा नफा झाला असून बँकेकडे 127 कोटी 47 लाखाच्या ठेवीही आहेत. तर बँकेने 94 कोटी 16 लाखाची कर्जे वितरित केली आहेत .
बँकेचे भाग भांडवल 2 कोटी 43 लाख रुपयांचे असून राखीव निधी 18 कोटी 67 लाख झाला आहे. बँकेने 47 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून 152 कोटीचे खेळते भांडवल आहे. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने 222 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला असून बँकेच्या मुख्य शाखेसह शहापूर, गोवावेस आणि मार्केट यार्ड अशा एकंदर चार शाखा कार्यरत आहेत असे त्यांनी सांगितले.
बँकेची निव्वळ आणि अनुत्पादित कर्जे शून्य टक्के असून एनपीएचे प्रमाणही 0% आहे असेही श्री अष्टेकर म्हणाले.
गेल्या वर्षभरात बँकेच्या ठेवीमध्ये सुमारे 22 कोटी रुपयांची वाढ झाली असून कर्जामध्ये सुद्धा 18 कोटी रुपये वाढ झाली. बँक दिवसेंदिवस आर्थिकरित्या सुदृढ व सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असून त्यादृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. सभासदांच्या ठेवींच्या सुरक्षिततेसाठी बँकेने पाच लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण प्रदान केले आहे.असेही अष्टेकर यांनी यावेळी सांगितले. यंदाही अ वर्ग सभासदांना 20% तर ब वर्ग सभासदांना आठ टक्के इतका लाभांश देण्याची घोषणा त्यांनी केली.
ज्येष्ठ सभासदांना यापुढे प्रत्येकी 2000 रुपये देण्याची मागणी यावेळी मान्य करण्यात आली. बँकेचे दोन संचालक रवी दोडणावर व लक्ष्मी कानूरकर यांच्या चुकीच्या वर्तनाबदल त्यांच्या निषेधाचा ठराव सभासदांनी मांडला आणि टाळ्यांच्या गजरात मंजूर केला. महिला सबलीकरणासाठी गेल्या आर्थिक वर्षात सुरू केलेली ग्रुप मायक्रो फायनान्स या पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचा विस्तार करण्यासाठी नव्या तीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत असे अष्टेकर यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत देवकुमार बिर्जे, नारायण किटवाडकर, विकास कलघटगी ,विजय मोरे, मारुती देवगेकर, विजय बोंगाळे, प्रभू राम सुभेदार यांनी भाग घेतला व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील यांनी आभार मानले.
या प्रसंगी संचालक अनंत लाड, शिवराज पाटील, सुवर्णा शहापूरकर, गजानन पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, सुहास तराळ, गजानन ठोकणेकर, विद्याधर कुरणे , मारुती शिगीहळळी आदी संचालक उपस्थित होते