बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कांही महत्त्वाचे निर्णय घेण्यात असून त्यापैकी प्रमुख निर्णय म्हणजे शहरातील खुल्या जागांवरील कचरा हटवून त्याचा खर्च संबंधित जागा मालकाकडून दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात येणार आहे.
बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा काल बुधवारी महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेत खाजगी खुल्या जागांमध्ये कचरा टाकण्याच्या प्रकाराला आळा घालण्याकरिता संबंधित जागेतील कचरा हटवून सदर स्वच्छतेचा खर्च घरपट्टी सोबत वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसाधारण सभेत अन्य कांही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते खालील प्रमाणे आहेत.
जन्म-मृत्यू नोंदणीच्या विकेंद्रीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, शिवाजीनगर येथील उद्यानाला राजमाता जिजाऊ यांचे नांव, मजगाव येथील तलावात विसर्जन कुंड बांधणे, ग्लास हाऊस मधील कार्यक्रमांसाठी शुल्क आकारणी रद्द,
अनुभव मंडप समोरील स्मार्ट सिटी योजनेतील काम रद्द, रामतीर्थनगर वसाहतीचे महापालिकेकडे हस्तांतरण, कंत्राटी कर्मचारी पुरवठा करणाऱ्या क्योनिक्स कंपनीला मुदत वाढ,
ओंकारनगर व वंटमुरी आश्रय कॉलनीला झोपडपट्टीचा दर्जा, बुडा सदस्यपदी नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांची निवड आणि जिनाबकुल येथील चौकाचे महर्षी वाल्मिकी असे नामकरण करणे.