बेळगाव लाईव्ह : विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अलीकडे प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार बेळगाव विमानतळावरून गेल्या जून 2023 मध्ये एकूण 23,184 प्रवाशांनी विमान प्रवासाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या माहितीत बेळगाव विमानतळाच्या 10 मार्गांपैकी बेळगाव बेंगलोर हा सर्वात व्यस्त मार्ग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बेळगाव विमानतळावरून विविध शहरांसाठी असलेल्या प्रादेशिक विमान सेवेअंतर्गत गेल्या जून महिन्यामधील प्रवासी वाहतुकीची आकडेवारी (अनुक्रमे प्रवास मार्ग, प्रस्थान केलेले प्रवासी, आगमन झालेले प्रवासी यानुसार) पुढील प्रमाणे आहे. बेळगाव ते बेंगलोर : 5016 प्रवाशांचे प्रस्थान, 4750 प्रवाशांचे आगमन. बेळगाव ते हैदराबाद : 1555, 1545. बेळगाव ते अहमदाबाद : 1100, 1250. बेळगाव ते मुंबई : 710, 680. बेळगाव ते सुरत : 789, 650. बेळगाव ते जोधपुर : 512, 482. बेळगाव ते इंदोर : 550, 478. बेळगाव ते नागपूर : 425, 410. बेळगाव ते तिरुपती : 610, 712. बेळगाव ते जयपूर : 450, 510. या पद्धतीने बेळगाव विमानतळावर गेल्या जून महिन्यात एकूण 11,467 प्रवाशांचे आगमन झाले तर एकूण 11,717 प्रवाशांनी बेळगावहून विविध शहरांना प्रस्थान केले.
स्टार एअरलाइन्सकडून बेळगाव येथून अहमदाबाद, इंदोर, जोधपुर, जयपुर, मुंबई, नासिक, सुरत, तिरुपती आणि नागपूर या 8 शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू आहे. त्याचप्रमाणे इंडिगो एअरलाइन्सच्या बेळगाव येथून बेंगलोर येथे दोन आणि हैदराबादला एक विमानसेवा आहे.
बेळगाव विमानतळावरून गेल्या जानेवारी 2023 पासून जूनपर्यंत दरमहा झालेल्या विमान फेऱ्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. जानेवारी -387, फेब्रुवारी -345, मार्च -457, एप्रिल -482, मे -538, जून -478. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) जुलै 2023 ची आकडेवारी अद्याप प्रसिद्ध केलेली नाही.
आगामी 29 ऑक्टोबर पासून बेळगाव दिल्ली आणि बेळगाव पुणे अशा इंडिगो च्या दोन नवीन विमान सेवा सुरू होणार आहेत त्यामुळे आगामी दिवसात बेळगाव विमानतळावरून प्रवास करण्याची संख्या नक्कीच वाढणार आहे.