सीबीटी अर्थात मध्यवर्तीय बस स्थानकानजीकच्या चौकातील बिघडलेल्या सिग्नलकडे पोलिसांसह संबंधित सर्वांचे दुर्लक्ष झाल्यामुळे सखेदाश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या या सिग्नलचा फक्त लाल दिवाच जळत असल्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
या समस्येबद्दल पोलिसांकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडून सिग्नलची व्यवस्था हे आमचे काम नाही. जा आणि महापालिकेला विचारा असे उत्तर मिळते. सर्वसामान्य दुचाकीस्वारांना पकडणे आणि भरमसाठ दंड उकळणे एवढेच काम रहदारी पोलीस करतात, डिजिटल इंडिया… वा मोदीजी वा!,
आय लव बेलगाम स्मार्ट सिटी, डिस्को लाईट, आम्हाला कधीही बेळगावातील सिग्नल महत्त्वाचे वाटले नाहीत. उलट पोलीस स्वतःच पुढे जा म्हणून सांगतात, ये सब चीजे बेलगाम मे ही हो सकती है, वेलकम टू न्यूयॉर्क, आपल्या सभोवतालच्या सर्व झाडांची कत्तल झाल्यानंतर आम्ही हिरवे पडणार आहोत बहुदा हेच तो लाल दिवा दर्शवत असावा आदी मजेदार आणि उपरोधात्मक प्रतिक्रिया सीबीटी येथील बिघडलेल्या सिग्नलसंदर्भात नेटकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकानजीकच्या चौक हा सतत गजबजलेला असतो या ठिकाणी दिवसभर रात्री उशिरापर्यंत वाहनांची मोठ्या प्रमाणात ये -जा सुरू असते. त्यामुळे अपघात व रहदारीची कोंडी टाळण्यासाठी खरंतर येथील सिग्नलची व्यवस्था कायम सुस्थितीत असली पाहिजे.
मात्र भर रहदारीच्या चौकातील सदर सिग्नल बिघडून फक्त लाल दिवाच दाखवत असल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. तरी महापालिकेसह वरिष्ठ रहदारी पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर सिग्नल तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी केली जात आहे.