घरातील सर्व मंडळी परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 1 लाख 30 हजार रुपये असा सुमारे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी मध्यरात्री गोंधळे गल्ली येथे घडली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गोंधळी गल्ली येथील चेतन कुरणे यांच्या घरी हा घरफोडीचा प्रकार घडला आहे. काल शुक्रवारी रात्री 12 नंतर सर्वत्र सामसूम होताच भरवस्तीत असलेल्या कुरणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
त्यानंतर घरात शोधाशोध करून चोरट्यांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 1 लाख 30 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. आपल्या कुटुंबासमवेत परगावी गेलेले चेतन कुरणे आज शनिवारी सकाळी आपल्या घरी परतले असता चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. तेंव्हा त्यांनी लागलीच पोलिसांना माहिती देऊन तक्रार नोंदविली.
चोरीची माहिती मिळताच खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच ठसे तज्ञ आणि पोलीस श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.
तथापी श्वानपथक गोंधळी गल्ली, गवळी गल्ली परिसरात घुटमळून परत आले. खडेबाजार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी चोरट्यांचे शोध कार्य हाती घेतले आहे. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात अलीकडच्या काळात झालेली ही सर्वात मोठी चोरीची घटना असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान खडे बजार मार्केट पोलिसांनी रात्रीच्या वेळी आणखी गस्त वाढवण्याची गरज देखील व्यक्त होत आहे.