शहरातील बी. एस. येडीयुरप्पा मार्गावरील ट्रान्सपोर्ट कार्यालयाच्या ठिकाणी येणाऱ्या अवजड मालवाहू वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून रहदारी पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील बी. एस. येडीयुरप्पा या दुपदरी मार्गाच्या एका बाजूला असलेल्या ट्रान्सपोर्ट कार्यालयांच्या ठिकाणी येणारी मालवाहू वाहने रहदारीस अडथळा निर्माण करणारी ठरत आहेत. सदर कार्यालयाच्या ठिकाणी इतर लहान, मध्यम वजनी मालवाहू वाहनांसह ट्रक आणि कंटेनर सारखी अवजड मोठी वाहने देखील येत असतात.
यापैकी अवजड वाहने येडीयुरप्पा मार्गावरून इजा करणाऱ्या शहरातील वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. ट्रक, कंटेनर सारखी अवजड वाहने मालाची चढउतार करण्यासाठी ट्रान्सपोर्ट कार्यालयाच्या ठिकाणी रस्त्यावर आडवी लावण्यात येत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो.
- याबाबत यापूर्वी अनेक वेळा ट्रान्सपोर्ट कार्यालय चालकांकडे तक्रार करून समजही देण्यात आली आहे. मात्र तरीही या ट्रान्सपोर्टवाल्यांची मनमानी सुरूच आहे
आज सकाळी एक मोठा कंटेनर मालाची चढउतार करण्यासाठी आडवा पार्क करण्यात आल्यामुळे येडीयुराप्पा मार्ग अर्धाहून अधिक व्यापला गेला होता. परिणामी वाहन चालकांना दुभाजका नजीकच्या रस्त्याच्या शिल्लक अरुंद जागेतून मोठी कसरत करत मार्गक्रमण करावे लागत होते. जुने बेळगाव, शहापूर, वडगाव येथील शेतकरी सकाळच्या वेळी या मार्गावरूनच जनावरांचा चारा आणण्यासाठी जात असतात.
तसेच या रस्त्यावर कामगाराची सतत ये जा असते. मात्र अलीकडे शहरामध्ये प्रवेश करण्यासाठीच्या या मुख्य रस्त्यावर वरील प्रमाणे वरचेवर रहदारीस अडथळा निर्माण केला जात आहे. तेंव्हा रहदारी पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.