बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहराचा विकास साधला जात असताना शहराचे मुख्य स्मशानभूमी असलेली सदाशिवनगर स्मशानभूमीची मात्र दुरवस्था झाली आहे. ही स्मशानभूमी अंत्यविधीचे स्थळ न राहता महापालिकेचे गोडाऊन आणि पालिकेच्या वाहनांचे पार्किंग स्थळ बनल्यामुळे नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे सध्याचे कर्तव्यदक्ष मनपा आयुक्त अशोक दूडगुंटी यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
बेळगाव शहरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी सदाशिवनगर स्मशानभूमीवर अवलंबून राहावे लागते. या स्मशानभूमीच्या विकासासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात योग्य ती काळजी घेतली जात नाही. सदाशिवनगर स्मशानभूमीचा परिसर विस्तीर्ण असून या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. कांही वर्षापासून या स्मशानभूमीत महापालिकेची खराब झालेली वाहने आणून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अडचण निर्माण होत असताना गेल्या कांही महिन्यांपासून शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणारी वाहने देखील स्मशानभूमी पार्क केली जात आहेत. त्यामुळे स्मशानभूमी आहे की पार्किंग स्थळ? असा प्रश्न स्मशानभूमीत येणाऱ्यांना पडू लागला आहे. सध्या सदाशिवनगर स्मशानभूमी म्हणजे पूर्णपणे महापालिकेच्या वाहनांसाठी पार्किंग स्थळ बनले आहे. स्मशानभूमीत पडून असलेल्या महापालिकेच्या नादुरुस्त वाहनांसह आता कचरा संकलन करणारी वाहने तसेच ऑटोरिक्षा वगैरे इतर वाहने देखील या ठिकाणी पार्क केली जात असल्याने अडचण निर्माण झाली आहे. येथील वाहने हटविण्यात यावीत यासाठी मध्यंतरी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र त्याचा काहींही परिणाम न होता स्मशानभूमीत पार्क केल्या जाणाऱ्या आणि खराब झालेल्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडे या ठिकाणी ऑटोरिक्षा देखील पार्क केल्या जात आहेत.
लोकप्रतिनिधींसह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांचेच दुर्लक्ष आणि कोणाचाही वचक नसल्यामुळे सध्या या स्मशानभूमीत कचऱ्याचे टिप्पर, कचरा कंटेनर गाड्या, जेसीबी मशीन्स, कुत्री पकडण्याची वाहने, ड्रेनेजमधील मैलायुक्त सांडपाण्याची वाहतूक करणारे टँकर वगैरे वाहने मोठ्या प्रमाणात पार्क केलेली पहावयास मिळत आहेत. यातभर म्हणून आता कांही रिक्षाचालक या स्मशानभूमीचा वापर आपल्या ऑटोरिक्षा पार्क करण्यासाठी करू लागले आहेत. वाहने पार्किंगचा हा प्रकार अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अडथळा निर्माण करणारा ठरत आहे. येथे ऑटोरिक्षांसह कचरा आणि मैल्याची उचल करणारी कांही वाहने चक्क अंत्यविधीच्या चौथर्यावर पार्क करण्याचा संतापजनक प्रकार सुरू असल्यामुळे नागरिकात क्षोभ व्यक्त होत आहे.
एकीकडे स्मशानभूमी परिसराचा वाहन पार्किंगसाठी वापर केला जात असताना दुसरीकडे या स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी असलेल्या इमारतीला टाकाऊ साहित्याच्या गोदामाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सदर इमारतीत सध्या शौचालयाची फुटलेली भांडी, फुटलेले पाईप, प्लास्टिकचे छोटे ड्रम, कचऱ्याचे गंजके डबे वगैरे टाकाऊ साहित्याची साठवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे विद्युत दाहिनी असलेल्या इमारतीला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. याखेरीज स्मशानभूमीतील कांही विकास कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. येथील कचराकुंडाची वेळच्यावेळी स्वच्छता केली जात नाही. परिणामी तो कायम मयतासाठी वापरलेले साहित्य आणि इतर केरकचऱ्याने ओसंडून वाहत असतो. स्मशानभूमीला अस्वच्छ आणि बकाल स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या या प्रकारांबद्दल नागरिकात तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. विद्यमान महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे सध्या अत्यंत कर्तव्य दक्षतेने कार्यरत असून शहर स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
तेंव्हा शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मनपा आयुक्तांनी आता सदाशिवनगर स्मशानभूमीतील वाहन पार्किंगच्या समस्येकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच संबंधित वाहने स्मशानभूमीतून हटवून त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याद्वारे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा. त्याचप्रमाणे सदर स्मशानभूमीचा वापर फक्त अंत्यसंस्कारासाठीच केला जाईल याची दक्षता घेण्याचा आदेश संबंधित अधिकारी आणि स्मशानभूमीच्या पर्यवेक्षकाला द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.