बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी समावेश झाल्यानंतर बेळगावकरांना अत्यानंद झाला होता. पण स्मार्ट सिटीचे काम आणि शहरातील वाढत्या समस्या लक्षात घेता आता शहर स्मार्ट नको… मूलभूत सुविधा द्या अशी मागणी शहरवासीय करत आहेत. यातील मुख्य समस्या आहे ती म्हणजे पार्किंगची. शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पार्किंगचा फार मोठा प्रश्न उद्भवला आहे. दुर्दैवाने शहराचे क्षेत्रफळ मात्र तेवढेच आहे. त्यामुळे वाहने कोठे पार्क करायची? हा प्रश्न केवळ नागरिकांनाच नव्हे तर प्रशासनालाही पडला आहे. अर्थात प्रशासनच यातून मार्ग काढू शकते. मात्र त्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
बेळगाव शहराचा विस्तार वाढण्याबरोबरच वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. त्यामुळे वाहन पार्किंगची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालली आहे. पूर्वी शहरात चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वाहन चालकांना यातायात करावी लागत होती, आता तर दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी देखील जागा मिळेनाशी झाली आहे. शहराची वाढती लोकसंख्या, विस्तार व वाहनसंख्येच्या तुलनेत रस्ते अरुंद ठरत आहेत. यात भर म्हणून कांही मोजक्या पार्किंगच्या जागा वगळता शहरात वाहन पार्किंगचे नियोजन नाही. महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार केली जात असल्यामुळे रहदारीत अडथळा निर्माण होऊन सतत वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. याचा फटका प्रामुख्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अग्निशामक दलाच्या वाहनांना बसत आहे.
रस्त्यांवर दुतर्फा वाहने पार्क करण्याबरोबरच बऱ्याचदा रस्त्याकडेला ट्रक, कंटेनर, स्कूल बसेसचे पार्किंग होत असल्यामुळे रहदारीच्या अडथळ्यात आणखी भर पडत आहे. याखेरीज आस्थापनांच्या तळघरांचा वापर पार्किंगसाठी करावा असा नियम असताना तो नियम पाळला जात नाही. संबंधित आस्थापनांच्या ठिकाणी येणारे वाहन चालक आपली वाहने रस्त्यावरच उभी करत असल्यामुळे पार्किंग समस्या अधिकच गंभीर बनली आहे. एकंदर परिस्थिती पाहता शहरातील पार्किंगची समस्या जटील होण्यास महापालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप आहे आणि ते खरे देखील आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून शहरातील पार्किंगची समस्या खरं तर ऐरणीवर आली आहे मात्र दुर्दैवाने जिल्हा, महापालिका आणि पोलीस प्रशासनान अद्यापही या समस्येकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. शहरात महापालिकेच्या मालकीची केवळ दोनच पार्किंग अर्थात वाहन तळ आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून देखील कांही ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहन पार्किंग सुरू करण्यात आले आहे. उर्वरित कांही ठिकाणी खाजगी पार्किंग करण्याची व्यवस्था आहे. तथापि वाहन संख्या वाढल्याने ही सर्व वाहनतळं अपुरी पडत आहेत. रहदारी पोलीस विभागाने महापालिका कार्यक्षेत्रातील कांही रस्त्यांवर सम -विषम पार्किंग व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वन-वे, टू-वे, नो पार्किंग झोन अशा विविध उपाय अवलंबले आहेत. तथापि हे प्रयत्नही पुरेसे नसल्याचे दिसत आहे. रहदारी पोलीस एकीकडे प्रयत्नशील असताना दुसरीकडे नागरिकांनी देखील रहदारी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नसल्यामुळे पार्किंग समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत आहे.
पाच वर्षांपूर्वी बेळगाव उत्तरचे तत्कालीन आमदार फिरोज सेठ यांच्या कार्यकाळात बापट गल्ली येथे बहुमजली वाहनतळ उभारण्याची 4 कोटी रुपये खर्चाची योजना महापालिकेने आखली होती. त्या संदर्भातील आराखडा देखील तयार झाला होता. मात्र माशी कुठे शिंकली माहित नाही वाहनतळाचा तो प्रस्ताव कागदावरच राहिला. त्यानंतर शहरात बहुमजली वाहनतळ उभारण्याची जबाबदारी बेळगाव स्मार्ट सिटी विभागाकडे देण्यात आली असली तरी त्यांच्याकडून देखील अद्याप ठोस अशी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. आता माजी आमदार फिरोज शेठ यांचे बंधू असिफ उर्फ राजू सेठ हे शहराचे आमदार झाले असल्यामुळे ते तरी शहरात बहुमजली पार्किंग कॉम्प्लेक्स उभारून पार्किंगची समस्या निकालात काढतात का? याकडे शहरातील पार्किंगच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिक आणि वाहन चालकांचे लक्ष लागून राहिले आहे.