बेळगाव शहरातील वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात किडवाई कॅन्सर हॉस्पिटल उभारणीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून आता हे हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलच्या अर्थात बीम्स हॉस्पिटल आवारात उभारण्यात येणार आहे.
वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळील 4 एकर 4 गुंठे खुल्या जागेमध्ये किडवाई कॅन्सर हॉस्पिटल निर्मितीचा प्रस्ताव होता. बेळगाव जिल्ह्यासह शहरातील विविध रुग्णांना याचा लाभ व्हावा या उद्देशाने या जागेची पाहणी करून आयुक्तांनी तसा प्रस्ताव शासनाला पाठविला होता.
मात्र आता सरकार पातळीवर हालचाली वाढवून वडगाव येथील हॉस्पिटलचा प्रस्ताव रद्द करून बीम्स येथे किडवाई कॅन्सर हॉस्पिटलची निर्मिती होणार आहे. बेळगावला किडवाई कॅन्सर हॉस्पिटल निर्मितीची घोषणा झाल्यानंतर 2022 -23 मध्ये अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी नजीकच्या जिल्ह्यात वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी राज्यात तीन ठिकाणी किडवाई हॉस्पिटलची घोषणा यापूर्वी करण्यात आली आहे.
त्यामध्ये बेंगलोर, तुमकुर व गुलबर्गा जिल्ह्याचा समावेश आहे. यात अलीकडे बेळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. बेळगाव येथील किडवाई कॅन्सर हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी 50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
पहिल्यांदा या हॉस्पिटलसाठी वडगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील जागेची पाहणी आयुक्तांनी आमदार अभय पाटील यांच्यासोबत केली होती. त्यानंतर आयुक्त आणि आमदार पाटील यांनी बेळगावला किडवाई कॅन्सर हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येणार असून भूसंपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती दिली होती.
तसेच त्यांनी वडगावला जागा संपादित करण्याचे संकेतही दिले होते. मात्र 19 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हॉस्पिटलच्या जागेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. वडगाव ऐवजी बिम्स परिसरात हॉस्पिटलची निर्मिती करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर सदर हॉस्पिटल वडगाव येथेच व्हावे यासाठी स्थानिक आमदार पाटील यांनी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
आता बीम्स हॉस्पिटल आवारामध्येच किडवाई कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णयाला गेल्या 27 सप्टेंबर 2022 मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाल्यामुळे बीम्स येथील किडवाई कॅन्सर हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.