बेळगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेतील कचऱ्याची उचल दिवसातून दोन वेळा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्या अनुषंगाने कचरा संकलन करणाऱ्या पाच ऑटो टिप्पर्सचा शुभारंभ काल बुधवारी करण्यात आला आहे.
आता महापालिकेच्या पाच ऑटो टिप्पर्सच्या सहाय्याने दररोज सकाळी व सायंकाळी अशा दोन्ही वेळी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील कचऱ्याची उचल केली जाणार आहे. मार्केट पोलीस ठाण्याच्या आवारात काल बुधवारी या नव्या उपक्रमाचा शुभारंभ झाला. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या संकल्पनेतून हा नवा उपक्रम सुरू केल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेतील कचऱ्याची समस्या निकालात निघणार आहे खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, काकती वेस, रविवार पेठ, नरगुंदकर भावे चौक आदी परिसर शहराच्या मुख्य बाजारपेठेत येतो. चार प्रभागात विभागल्या गेलेल्या या बाजारपेठेत कर्नाटकसह महाराष्ट्र व गोव्यातून ग्राहक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे बाजारपेठेतील स्वच्छता महत्त्वाची असल्याचे आयुक्त दुडगुंटी यांचे म्हणणे आहे.
त्यामुळेच मुख्य बाजारपेठेतील कचऱ्याची उचल दिवसातून दोन वेळा करण्याची सूचना त्यांनी आरोग्य व पर्यावरण विभागाला दिली आहे.
शहरातील बाजारपेठेतील कचऱ्याची उचल दररोज सकाळी होतेच. आता दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत ही कचऱ्याची उचल केली जाणार आहे. काल या उपक्रमाचा शुभारंभ झाला असला तरी मंगळवारपासूनच त्याची सुरुवात झाली आहे. सर्व पाचही ऑटो टिप्पर्सना ध्वनिक्षेपक बसविले असून त्यावरून कचरा देण्याबाबतची उद्घोषणा केली जात आहे.
बाजारपेठेतील सर्व आस्थापनांसमोर जाऊन दिवसभर त्यांच्याकडे साचलेला कचरा संकलित केला जात आहे. महापालिकेच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांसह दुकानदार व आस्थापन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.