उद्यमबाग पोलिसांनी एका दिव्यांग व्यक्तीवर हल्ला करून त्याला मारहाण करण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे असे स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मान्य केले असून याप्रकरणी खातेनिहाय चौकशीचा आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
बेळगावच्या सांबरा विमानतळावर आज शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते. पोलिसांनी अपंग व्यक्तीवर केलेला हल्ला समर्थनीय नाही. त्यासाठी नुकताच खातेनिहाय चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
एवढेच नाही तर संबंधित पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचनाही देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या पोलीस आयुक्तांनी कारवाई दाखल संबंधित तीन पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले.
मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव भेटीप्रसंगी कंत्राटदार संतोष पाटील याच्या आत्महत्ये प्रकरणी अद्याप आपल्याला न्याय मिळाला नसल्याचे निवेदन मयत कंत्राटदाराच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.
यासंदर्भात बोलताना सदर प्रकरणाची कायद्याच्या चौकटीत सखोल चौकशी करून क्रम घेतले जातील असे सांगितले. तसेच मागील भाजप सरकारच्या कालावधीत कंत्राटदारांनी केलेली विकास कामे तपासून त्यांच्या प्रलंबित बिलांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.