सध्याच्या पावसाळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज मंगळवारी सकाळी साई कॉलनी, कणबर्गी रोड आणि कणबर्गी परिसराचा पाहणी दौरा करून तेथील रहिवाशांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेतल्या.
आपल्या या पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार असिफ सेठ यांनी पडझड झालेल्या घरांना भेटी देऊन पाहणी करण्याबरोबरच संबंधित कुटुंबीयांची विचारपूस केली. त्याचप्रमाणे साई कॉलनी आणि कणबर्गी परिसरातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची पाहणी केली.
यावेळी बोलताना आमदार सेठ म्हणाले की, लोकप्रतिनिधी या नात्याने लोकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाईन्समुळे आता बेळगावच्या जनतेला प्रशासनापर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे.
तथापि आमदार या नात्याने मतदार संघाचा दौरा करून जनतेच्या अडीअडचणी, समस्या, तक्रारी प्रत्यक्ष जाणून घेणे हे माझे कर्तव्यच आहे असे सांगून या भागाच्या सुधारणेसह लोकांच्या हितासाठी त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार असिफ सेठ यांनी स्पष्ट केले.