Tuesday, December 24, 2024

/

स्वच्छता कामातही भाषिक रंग?

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील पौरकार्मिकांना तात्काळ नोकरीतून कमी करावे, अशी मागणी कर्नाटक नवनिर्माण सेनेने (कनसे) एका निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या पद्धतीने स्वच्छता कामालाही भाषिक रंग देण्याद्वारे कानडी संघटनांनी शहराची शांतता बिघडवण्यास सुरूवात केली आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीमध्ये पुरेशे पौरकारमिक आहेत. तथापि कांही भाजप नगरसेवकांकडून स्वच्छतेच्या कामासाठी मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या पौरकारमिकांना प्राधान्य दिले जात असल्याबद्दल निवेदनात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

स्वच्छतेच्या कामासाठी कोवाड महाराष्ट्र येथील पौरकारमिकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना येथे आणून काम देणारे कोण आहेत? मूळचे महाराष्ट्रातील असलेले जेवढे म्हणून पौरकार्मिक आहेत त्यांना तात्काळ कामावरून कमी करण्यात यावे आणि त्यांच्या जागी स्थानिक कामगारांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महापालिकेत राजकीय पक्षाच्या सदस्यांच्या परिचितांना प्राधान्य दिले जात आहे. तथापि त्यांची पात्रता आणि कोणत्या आधारावर त्यांची नेमणूक करण्यात आली आहे याची सखोल चौकशी केली जावी. पालिकेत कन्नडीगांना प्रथम प्राधान्य दिले जावे अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी निवेदनाचा स्वीकार करून येत्या पाच दिवसात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी कनसे जिल्हाध्यक्ष बाबू संगोळी, संतोष गुबची, रवी साखे, बसवराज दोडमनी, सागर संपगावी, रोहित अनगोळकर ओमकार करवीनकोप, कमलेश चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.City corporation

दरम्यान, देशातील बहुतांश महापालिकांमध्ये परराज्यातील पौरकार्मिक हे असतातच. मुळात सफाई कामगार कुठले असोत त्यांनी आपल्या शहराची स्वच्छता केली की झालं. त्यामुळे महाराष्ट्रमधील पौरकार्मिक अर्थात सफाई कामगारांना काढून टाका म्हणणे कितपत योग्य? जे सफाई कामगार शहर स्वच्छतेचे काम चांगल्या पद्धतीने करतात.

आपले कर्तव्य चोख पार पाडतात, अशांकडूनच स्वच्छता करून घेणे गरजेचे असून त्यात कांहीच गैर नाही. मात्र आता केवळ महाराष्ट्रीयन आहेत म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना काढून टाका अशी मागणी केल्याने हा वादाचा विषय तयार झाला आहे.मुंबई मनपात ठेकेदारा कडून उत्तर भारतीय स्वच्छता कामगारा कडून काम करवून घेतले जाते बंगळुरु मध्येही आजू बाजूचे कामगार आढळतात अश्या वेळी स्वच्छतेला प्राधान्य गरजेचे आहे अश्या ही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

या पद्धतीने कन्नड संघटनांनी स्वच्छतेच्या कामालाही भाषिक रंग देण्याचा प्रयत्न प्रारंभ केल्यामुळे तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे. महापालिका किंवा इतर प्रशासन याबाबतीत कोणती भूमिका घेणार? हे पाहणे औत्सूक्याचे ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.