बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध लक्ष्मी मंदिरातील देवीच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. हा प्रकार उघड होताच नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
बेळगाव शहर व तालुक्यातील चोरट्यांचा धुमाकूळ काही थांबायचं नाव घेत नाही. कधी घरफोडी तर कधी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणे, तर कधी बेधडक दरोडे असे प्रकार सध्या वाढताना पाहायला मिळत आहेत.
मंगळवारी रात्री बिजगर्णी गावाच्या मध्यभागी असलेल्या श्री लक्ष्मी मंदिर या ठिकाणी लक्ष्मी देवीच्या गळ्यातील चोरट्यांनी एक तोळा मंगळसूत्र,दीड तोळा पुतळ्या,आणि अर्धा तोळा नथनी असा एकूण जवळपास दोन लाख रुपये ऐवज लंपास केला आहे. पण, चांदीच्या वस्तुना तोडण्यासाठी प्रयत्न केला मात्र, प्रयत्न असफल झाल्यामुळे चांदीच्या वस्तू तिथेच टाकून पळ काढला.
सकाळी मंदिर परिसरातील महिलेने मंदिराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून पूजारी अशोक कोळी यांना बोलाविण्यात आले. त्यानंतर मंदिरात प्रवेश करताच देवीच्या किंमती वस्तू चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. मंदिराचा मुख्य दरवाज्याची कटी तोडून मंदिरात प्रवेश करून आतील किंमती वस्तू पळवण्यापर्यंत आता चोरट्यांचे धाडस पोहोचल्याने आता पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न भाविक विचारात आहेत.
सदर चोरीची घटना कळल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या चोरीनंतर आता सर्वच मंदिराच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.