बेळगाव लाईव्ह :कॅन्टोन्मेंट भागातील सेंट झेवियर्स हायस्कूल येथून म. गांधी चौक पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा टाकण्यात येत असल्यामुळे सध्या ठीकठिकाणी साचलेल्या कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. परिणामी रस्त्याच्या सौंदर्यास बाधा निर्माण झाली असून सदर कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे.
हिंडलगासह वेंगुर्ल्याच्या दिशेने दिशेने जाणारा कॅम्प येथील सेंट झेवियर्स हायस्कूल ते महात्मा गांधी चौक या दरम्यानच्या रस्त्याला सध्या कचरा डेपो सदृश्य स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा केरकचऱ्यासह टाकाऊ अन्न, कचरा वगैरे भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर कचऱ्याचे साम्राज्य पसरून त्याचे ढिगारे साचले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डसह महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हा कचरा दिवसेंदिवस वाढत असून रस्त्याला बकाल स्वरूप प्राप्त होण्याबरोबरच अस्वच्छता व दुर्गंधी वाढू लागली आहे.
महात्मा गांधी चौक ते सेंट झेवियर्स हायस्कूल दरम्यानचा रस्ता हा सावंतवाडी वेंगुर्ल्याकडून म्हणजे महाराष्ट्रातून बेळगाव शहरात येणाऱ्या प्रवासी नागरिकांसाठी शहराचा प्रवेश मार्ग आहे. सध्या या परगावच्या पाहुण्या नागरिकांचे स्वागत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ओंगळवाण्या कचऱ्याच्या ढिगार्यांनी होत आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील बेळगाव स्मार्ट सिटीच्या प्रतिमेला तडा जात आहे.
त्याचप्रमाणे या रस्त्यावरून नेहमी ये -जा करणाऱ्या नागरिक व दुचाकी वाहनचालकांना दुर्गंधीयुक्त अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांच्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घ्यावी.
तसेच सदर रस्त्याच्या दुतर्फा खरोखर अनाधिकृत कचरा डेपो निर्माण होण्यापूर्वी रस्त्याशेजारील कचऱ्याची तात्काळ उचल करण्याबरोबरच पुन्हा तिथे कचरा टाकला जाणार नाही या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
कॅम्प भाग छावणी सीमा परिषद परिसर स्वच्छ असतो असे सगळेच जण म्हणत असतात मात्र रस्त्याशेजारी टाकलेला कचरा पाहिल्यास कॅम्प भागाबद्दल नक्कीच लोकांचे मत बदलणार आहे. कॅम्प भागातील लोकांनी हा कचरा रस्त्या शेजारी टाकलाय की मनपा व्याप्तीत राहणाऱ्यानी हा कचरा टाकलाय याबाबतीत शोध घ्यावा लागणार आहे.