विधानसभा निवडणुकी प्रसंगी तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा माघारी भारतीय जनता पक्षात आणले जावे, अशी सूचना भाजप हाय कमांडने केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
खासदार शोभा करंदलाजे यांच्यावर शेट्टर आणि सवदी यांना पुन्हा माघारी पक्षात आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आले असल्याचेही बोलले जात आहे. मात्र या संदर्भात संबंधितांपैकी कोणीही अद्याप आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
सध्या काँग्रेस पक्षामधून आमदार झालेले लक्ष्मण सवदी यांना भाजपमध्ये माघारी आणणे थोडे कठीण असले तरी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची मनधरणी करून त्यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे समजते. जगदीश शेट्टर यांच्या विश्वासातील त्यांचे निकटवर्तीय माजी मंत्री, भाजपमधील त्यांचे शिष्य असलेले आमदार यांना हाताशी धरून शेट्टर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने आता ती जबाबदारी थेट शोभा करंदलाजे यांच्यावर सोपवली आहे.
जगदीश शेट्टर यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी सध्या शेट्टर यांचे बंधू विधान परिषदेचे सदस्य असलेले प्रदीप शेट्टर यांच्यासह शेट्टर कुटुंबीयांशी निकटचे संबंध असलेल्या व्यक्तींशी भाजप संधान साधून आहे.
एकंदर संबंधितांच्या मदतीने भाजप हाय कमांड पुन्हा आपले ‘रिव्हर्स ऑपरेशन’ सुरू करण्यास सज्ज झाले असून जगदीश शेट्टर त्याला कसा प्रतिसाद देतात हे पहावे लागणार आहे.