बेळगाव लाईव्ह:दुर्दशा होऊन मृत्यूचा सापळा बनलेल्या कणकुंबी, चोर्ला मार्गे गोव्याला जाणाऱ्या रस्त्याची युद्धपातळीवर चांगली दुरुस्ती करावी या मागणीसाठी येत्या सोमवार दि 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता कणकुंबी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असून जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पारवाड ग्रामपंचायत अध्यक्ष भिकाजी अर्जुन गावडे यांनी केले आहे.
बेळगाव ते गोवा मार्गावरील बेटणा -कणकुंबी दरम्यान ट्रक अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज सकाळी चोर्ला घाटामध्ये दोन ट्रकचा अपघात होऊन सुमारे 2 तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम झाला होता. या पार्श्वभूमीवर कणकुंबी येथील सामाजिक कार्यकर्ते व पारवाड ग्रा. पं. अध्यक्ष भिकाजी अर्जुन गावडे बोलत होते.
कणकुंबी, चोर्ला मार्गे गोव्याला जाणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मी काल येत्या 4 सप्टेंबर रोजीच्या रास्ता रोको आंदोलनाबाबत स्थानिक पातळीवर आवाहन केले होते. त्यामुळेच म्हणून की काय संबंधित कंत्राटदाराने तात्काळ जेसीबी पाठवून रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये माती टाकण्याद्वारे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू केला आहे. बेटणा ते कणकुंबी दरम्यान रस्त्यावर एक धोकादायक खड्डा पडला आहे.
सदर खड्डा चुकवण्याच्या नादात काल दोन ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. या पद्धतीने सदर वाताहत झालेला रस्ता दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे, असे अध्यक्ष गावडे यांनी पुढे सांगितले.
सुरळीत आणि सुरक्षित वाहतुकीसाठी सदर रस्त्याची युद्धपातळीवर चांगली दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये मंजूर झाले असताना 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र त्याचाही संपूर्ण योग्य विनियोग करण्याऐवजी रस्त्याचे अवघे 35 हजार रुपयांचे निकृष्ट विकास काम करण्यात आले आहे. तेंव्हा सदर रस्त्याची युद्धपातळीवर दर्जेदार दुरुस्ती व्हावी.
तसेच रस्त्याच्या दुर्दशेसंदर्भात सरकार आणि संबंधित कंत्राटदाराला जाब विचारण्यासाठी आम्ही येत्या सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कणकुंबी येथे रास्ता रोको आंदोलन छेडणार आहोत अशी माहिती देऊन कणकुंबी, पारवाड, बेटणा आदी गावांमधील नागरिकांसह या रस्त्याचा वापर करणाऱ्या समस्त वाहनचालक व जनतेने या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रा. पं. अध्यक्ष भिकाजी गावडे यांनी केले आहे.