सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री मंत्री सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी हे आपल्या समर्थकांसह बीम्स हाॅस्पिटलच्या लिफ्टमध्ये जवळपास 20 मिनिटे अडकून पडल्याची आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन प्रशासनाची धावपळ उडाल्याची घटना आज सकाळी घडली.
नागपंचमीनिमित्त रुग्णांना फळे आणि दुधाचे वाटप करण्यासाठी आज सोमवारी सकाळी युवा नेते राहुल जारकीहोळी आपल्या समर्थकांसमवेत बिम्स हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळी हाॅस्पिटलच्या लिफ्टमध्ये क्षमते पेक्षा अधिक जण चढल्यामुळे तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट बंद पडली. परिणामी सुमारे 20 मिनिटांहून अधिक काळ राहुल जारकीहोळी आणि त्यांचे सहकारी लिफ्टमध्ये अडकून पडले होते.
त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन जिल्हा आणि पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. मात्र त्यानंतर अल्पावधीत जिल्हा रुग्णालयाच्या तांत्रिक विभागाने लिफ्टचा तांत्रिक बिघाड दूर करून लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
मंत्री पुत्र लिफ्टमध्ये अडकून पडल्याची ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राहुल जारकीहोळी यांच्या समवेत त्यांचे चार-पाच समर्थक बीम्सचे दोघं डॉक्टर असे एकूण 15 जण अडकून पडले होते.
नेहमी प्रशासकीय सावळा गोंधळ स्वच्छता आणि रुग्णांची होणारी हेळसांड यामुळे बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटल नेहमी चर्चेत असते. आजही मंत्री पुत्र राहुल जारकीहोळी लिफ्टमध्ये अडकल्यामुळे हे हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
बीम्सच्या लिफ्ट मध्ये अडकले काँग्रेसचे राहुल.|Belgaum Live – बेळगाव लाईव्ह|@JarkiholiSatish https://t.co/HK3lAZxQh5 pic.twitter.com/AerLi1lNrg
— Belgaumlive (@belgaumlive) August 21, 2023