बेळगाव लाईव्ह :जिल्हाशिक्षणाधिकारी पदासाठी दोन वरीष्ठ अधिकार्यांत गेल्या काही दिवसांपासून मोठी चूरस पाहायला मिळत आहे.
एक झाला की दुसर्या, दुसरा झाला की पुन्हा पहिला असा खो-खो सुरू असून दोघेडी बंगळूरवरूनच सुत्रे हलवत आहेत. त्यांच्या या खो-खो मुळे शिक्षण विभागाचे कामकाज मात्र चर्चेत आले आहे.
बसवराज नलतवाड यांची बदली करण्यासाठी आणि जिल्हाशिक्षणाधिकारी पद आपल्याकडे खेचून आणण्यासाठी ए. बी. पुंडलिक यांनी काही दिवसांपूर्वी प्रयत्न केले होते.
त्यानुसार त्यांची जिल्हाशिक्षणाधिकारी पदी वर्णी लागली. पण, दोनच दिवसात पुन्हा नलतवाड यांनीच खुर्ची ताब्यात घेतली. बंगळूरला जाऊन त्यांनी आपली बदली रद्द करून घेतली.
त्यानंतर पुंडलिक यांनी खचून न जाता पुन्हा वरिष्ठांकडे लिंक लावून जिल्हा शिक्षणाधिकारीपद आपल्याकडे खेचून आणले आहे.
दोन दिवसांपासून ते जिल्हाशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहात आहेत. आता पुन्हा नलतवाड हे त्यांना खो देतात की नाही हे मात्र पाहावे लागणार आहे.