बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने 2023 -24 च्या अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून राज्यातील मालमत्ता मार्गदर्शन मूल्यात (रेडी रेकनर) वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी बेळगाव शहरामध्ये सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे या दरवाढी संदर्भात आक्षेप नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मार्गदर्शन मूल्य हे सरकारच्या निश्चित केलेल्या दरासंदर्भात असून त्याखाली कोणतीही मालमत्ता विकता येत नाही. मालमत्ता खरेदीवरील निर्धारित स्टॅम्प ड्युटीच्या आधारे हे मूल्य निश्चित केले जाते, ज्याला रेडी रेकनर रेट, सर्कल रेट किंवा कलेक्टर रेट असे देखील म्हंटले जाते.
बेळगाव शहर आणि तालुक्यातील रेडी रेकनरचे दर वाढविण्यात आले आहेत. बेळगाव शहरात या दरात 40 ते 50 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यावर आक्षेप नोंदविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. आक्षेपांची पडताळणी झाल्यावर रेडिरेकनरचे अंतिम दर जाहीर केले जाणार आहेत.
दरम्यान, दक्षिण उपनोंदणी कार्यालयाकडून नवे दर गेल्या 16 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले आहेत. हे नवे दर कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आले असून सात दिवसात आक्षेप नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. उत्तर उपनोंदणी कार्यालयाकडून रेडी रेकनरचे वाढीव दर काल 18 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले आहेत. या दरावरही सात दिवसात आक्षेप नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.
वाढीव दरावर आक्षेप नोंदविले गेले तरी सरकारकडून त्याची फारशी दखल घेतली जात नाही हे आधीच्या दरवाढी वेळी दिसून आले आहे. त्यामुळे यावेळी रेडी रेकनर दर वाढणार हे नक्की आहे.
बेळगाव महापालिकेच्या अंदाजपत्रकीय बैठकीत तसेच अर्थ स्थायी समिती बैठकीत घरपट्टी वाढ न करण्याचा निर्णय झाला आहे. तथापि आता शासनाच्या आदेशानुसार रेडी रेकनरचे दर वाढले की घरपट्टीमध्ये देखील वाढ करावीच लागणार आहे. त्यामुळे बेळगावकरांवर घरपट्टी वाढीची टांगती तलवार आहे.