स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) म्हणून समर्थपणे सेवा बजावलेले लोकप्रिय वरिष्ठ आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांना “राष्ट्रपती पदक” जाहीर करण्यात आले आहे.
संदीप पाटील यांनी बेळगावसह राजधानी बेंगलोर येथे विविध पदांवर कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या अतिशय उल्लेखनीय अशा कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचे राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेले संदीप पाटील सध्या पश्चिम बेंगलोरचे वरिष्ठ पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावत आहेत.
बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) असतानाच्या त्यांच्या कारकिर्दीत जनस्नेही असा पोलिस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दरी कमी करणारा “जनता दर्शन” कार्यक्रम सुरू झाला. जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयामध्ये आयोजित या जनता दर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांशी संबंधित असलेली अनेक वर्षे प्रलंबित अशी भांडण-तंटे व समस्यांची प्रकरणे निकालात काढण्यात आली होती.
या पद्धतीने जनसंपर्क वाढवून संदीप पाटील यांनी जनतेचा विश्वास संपादन केला होता. पुढे सरकारी बदल्या अंतर्गत त्यांची बेळगावहून अन्यत्र बदली करण्यात आली. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या संदीप पाटील यांच्या बदलीमुळे तेंव्हा जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. तसेच सरकारने त्यांची बदली करू नये. पुढील 24 तासात त्यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी बेळगावसह जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनेही छेडण्यात आली होती.
संदीप पाटील यांची बदली रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देत बेळगाव येथील विविध संघटनांनी त्यावेळी शहरात मोठे आंदोलन केले होते.