कर्नाटक राज्यातील सात शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजना सुरू आहे. या सात शहरांमधील मिळून 1,870 कोटी रुपयांची 69 विकास कामे प्रलंबित आहेत.
सर्वाधिक म्हणजे 23 कामे मंगळूर शहरात प्रलंबित असून या क्रमवारीत 6 प्रलंबित कामांसह बेळगाव शहर पाचव्या क्रमांकावर आहे. बेळगाव शहरातील स्मार्ट सिटी योजनेची 153 कोटी 70 लाख रुपयांची 6 विकास कामे अद्याप प्रलंबित आहेत.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत कर्नाटकातून सर्वप्रथम बेळगाव शहराची निवड झाली होती 25 जून 2016 रोजी बेळगाव येथील स्मार्ट सिटी योजनेच्या कामांचा प्रारंभ झाला होता सदर कामे 30 जून 2021 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते तथापि 2020 व 2021 या दोन्ही वर्षात कोरोनाची समस्या उद्भवल्यामुळे कामे पूर्ण करण्यात अडचण निर्माण झाली होती.
परिणामी योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवी म्हणजे 30 जून 2023 ही डेडलाईन देण्यात आली मात्र वाढीवकाळात राज्यातील सात शहरांपैकी एकाही शहरातील स्मार्ट सिटी योजनेची कामे पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तथापि या वर्षभरातही सातही शहरांमधील प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.
बेळगाव शहरातील प्रलंबित 6 विकास कामे पूर्ण करण्यासाठी जून 2024 ही नवी डेडलाईन देण्यात आली आहे. मात्र व्हॅक्सिन डेपोत स्मार्ट सिटी योजनेतून सुरू असणाऱ्या कामांना न्यायालयाचा स्थगिती आदेश देण्यात आल्याने ही नवी डेडलाईन पाळणे स्मार्ट सिटी विभागाला शक्य नसलेल्याचे चित्र आहे. याखेरीस टिळकवाडीतील कला मंदिराच्या जागेतही बहुउद्देशीय व्यापारी केंद्राचे काम अद्याप पूर्ण होणे बाकी आहे. राज्यातील संबंधित सात स्मार्ट शहरांमधील प्रलंबित कामांसाठीचा शिल्लक निधी आणि प्रलंबित कामांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
मंगळूर : शिल्लक निधी रु. 583.37 कोटी, शिल्लक कामे 23. हुबळी : निधी रु. 323.35 कोटी, शिल्लक कामे 5. बेंगळूर : निधी रु. 298.84 कोटी, शिल्लक कामे 7. दावणगिरी : निधी रु. 291.9 कोटी, शिल्लक कामे 13. बेळगाव : निधी रु. 153.7 कोटी, शिल्लक कामे 6. तुमकुर : निधी रु. 132.18 कोटी, शिल्लक कामे 9. शिमोगा : निधी रु. 87.62 कोटी, शिल्लक कामे 6.