बेळगाव लाईव्ह: बेळगाव तालुक्याच्या राजकारणावर बराचसा प्रभाव असणारा काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अनेकांनी तयारी चालवली आहे. संचालकाच्या 15 जागांसाठी एकूण 55 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत शनिवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी 20. जणांनी अर्ज भरले त्यामुळे खरी चुरस निर्माण झाली आहे.रविवारी या दाखल केलेल्या अर्जांची छाननी होणार आहे त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
काकती येथील मार्कंडेय सहकारी कारखाना तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. अनेकांच्या प्रयत्नांनंतर तीन वर्षांपासून कारखान्यात गाळप हंगाम साधण्यात येत आहे. कारखाना सुस्थितीत आल्यामुळे संचालक पदासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत.
त्यामध्ये तालुक्यातील दिग्गज राजकीय लोकांचा देखील समावेश आहे. 27 ऑगस्ट रोजी या कारखान्यासाठी मतदान होणार आहे. त्यामुळेच या निवडणुकीत अनेक जण नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत.
सहकारी कारखान्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोकांच्या मते जुनेच संचालक मंडळ कार्यरत रहावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे तर कारखान्याचा विकास करण्यासाठी जुन्या आणि नव्या संचालकांचा मेळ चांगला राहील, असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे ही निवडणूक कशी होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.
विद्यमान संचालकांनी शनिवारी अर्ज दाखल केले
विशेष म्हणजे अध्यक्ष अविनाश पोतदार, आर आय पाटील यांच्यासह इतर संचालकांचा समावेश आहे तर उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी आधीच अर्ज दाखल केला होता.
मार्कंडेय च्या निमित्ताने पुन्हा एकदा तालुक्याचे राजकारण तापले आहे त्यामुळे इच्छुकांनी संस्थेत आपापली वर्णी लावून घेण्यासाठी लॉबिंग देखील करायला सुरू केली असून ठिकठिकाणी बैठकांचे सत्र चालू झाले आहे.
मार्कंडेय साखर कारखान्यात भागधारकांची संख्या जवळपास दहा हजाराहून अधिक आहे मात्र जवळपास तीन हजार शेअर होल्डरनाच मतदानाचा अधिकार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्यामुळे जर निवडणूक होऊन मतदान झाल्यास या तीन हजार मतांना महत्त्व प्राप्त होणार आहे.