बेळगाव लाईव्ह:हेस्कॉमने सध्या पूर्वीच्या घरगुती जुन्या वीज मीटरच्या जागी नवे डिजिटल मीटर बसविण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र या कामासाठी खासबाग येथे कांही कर्मचारी नागरिकांकडून पैसे उकळत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
शहरातील पूर्वीच्या घरगुती जुन्या वीज मीटरच्या जागी नवे डिजिटल मीटर बसविण्याचे काम सध्या हेस्कॉमने हाती घेतली आहे. घरोघरी असलेली जुनी वीज मीटर्स काढून त्याऐवजी विनामूल्य नवी डिजिटल मीटर्स बसविण्यात येत आहेत. खासबाग येथे मात्र याउलट प्रकार घडत असून या ठिकाणी संबंधित कर्मचारी डिजिटल मीटर बसवण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
जाब विचारल्यास आपल्या कंत्राटदाराचे नांव व फोन नंबर देण्यास टाळाटाळ करणारे हे कर्मचारी खुशीने 50 रुपये तरी द्या, अशी मागणी नागरिकांकडे करत आहेत.
यासंदर्भात कांही जागरूक नागरिकांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता नवीन डिजिटल मीटर बसवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे खासबाग येथे पैसे उकळण्याचा जो प्रकार सुरू आहे, त्याकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन सदर प्रकार थांबवावा, अशी मागणी केली जात आहे.