कांहीजण निवड म्हणून, अथवा मिळालेल्या संधीमुळे उद्योजक बनतात, तर कांही परिस्थितीमुळे उद्योजक बनतात. 65 वर्षीय सरला कडाली यादेखील त्यापैकीच एक आहेत. घरचा एकमेव कर्ता पुरुष असलेल्या निकेश या आपल्या मुलाच्या अकाली मृत्यूमुळे त्यांचा उद्योजकतेचा प्रवास सुरू झाला आहे.
कडाली कुटुंब अलीकडेच खादरवाडी उद्यमबाग येथील आपल्या नव्या घरात राहण्यास गेले आहे. त्यावेळी सरला कडाली यांचा मुलगा निकेश याच्यावर कर्जाच्या हप्त्याचे ओझे होते. यातूनच अल्पशा आजाराने गेल्या मार्च महिन्यात त्याचे निधन झाले.
सरला यांचे 67 वर्षीय पती सिक्युरिटी गार्ड आहेत. घरातील लहान मुलांची शैक्षणिक फी आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी कडाली कुटुंब अंगावर पडेल ते काम करून पैशाची जमवाजमा करत असते.
साड्यांचा वापर करून उबदार ब्लॅंकेट्स अर्थात गोधड्या आणि दुपटी शिवण्यात सरला यांचा चांगलाच हातखंडा आहे. याबरोबरच साड्या, बेडशीट्स किंवा फॅक्टरीतील टाकाऊ कपड्याच्या तुकड्यापासून पिशव्या बनवण्याचे काम देखील त्या करतात.
उद्योजक बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरला यांच्या सहाय्यार्थ साड्या संकलित करण्याची मोहीम उघडण्यात आली आहे. संकलित केलेल्या या साड्यांचा वापर गोधड्या, दुपटी आणि पिशव्या बनविण्यासाठी केला जाणार असून त्यांच्या विक्रीद्वारे कडाली कुटुंबाच्या सहाय्यार्थ निधी उभा केला जाणार आहे. तरी या विधायक कार्यासाठी ज्यांना आपल्याकडील चांगल्या स्थितीतील साड्या द्यावयाच्या असतील त्यांनी पुढील पत्त्यावर नमूद केलेल्या दिवशी भेट द्यावी.
ऑगस्ट 20, 21 व 22 रोजी स्थळ -महावीर भवन हिंदवाडी रूट्स प्रदर्शन काळात. कृपया आर्थिक देणगी स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच इच्छुकांनी अधिक माहितीसाठी +919036902022 या क्रमांकावर सरला यांची मुलगी अश्विनी हिच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.