बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे सर्व विकासकामे पूर्ण झाल्याचे कम्प्लिशन सर्टिफिकेट (सीसी) असणाऱ्या शहरातील खाजगी ले-आउटमध्ये घरांसाठी बांधकाम परवाना देताना विकास शुल्क (डेव्हलपमेंट चार्ज) न आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे.
आता विकसित ले-आउट मधील भूखंड विकत घेणे फायद्याचे ठरणार आहे. कारण महापालिकेकडून त्यावर विकास शुल्क आकारणी केली जाणार नाही. महापालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात हा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. यामुळे महापालिकेच्या महसूलावर परिणाम होणार असला तरी नागरिकांची आर्थिक बचत होणार आहे.
बांधकाम परवाना देताना विविध प्रकारचे शुल्क आकारले जाते, त्यात विकास शुल्क आकारणीचाही समावेश आहे. आधी महापालिकेकडून एका गुंठ्यासाठी 24 हजार रुपये विकास शुल्क आकारले जात होते. सात वर्षांपूर्वी त्यात दुप्पट वाढ होऊन विकास शुल्क तब्बल 48 हजार रुपये इतके झाले होते.
पुढे वर्षभरापूर्वी पुन्हा त्यात वाढ झाली व विकास शुल्क प्रतिगुंठा 62 हजार 500 रुपये झाले. खरेदी केलेल्या भूखंडावर बांधकाम परवाना मिळवताना विकास शुल्क भरून अर्जदार मेटाकुटीला येतो. तथापि आता 100 टक्के विकसित खाजगी ले-आउट मधील भूखंड धारकांना विकास शुल्कात संपूर्ण सूट मिळणार आहे.
याआधी विकसित ले-आउट मधील भूखंडांवर इमारत बांधण्यासाठी देखील विकास शुल्क आकारले जात होते. तथापि एखादे लेआउट 100 टक्के विकसित असेल तर तेथे बांधकाम परवाना देताना विकास शुल्क न करण्याची तरतूद महापालिका कायद्यात आहे. मात्र या तरतुदीची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जात नव्हती.
आता प्रशासकीय काळात हा प्रकार निदर्शनास येताच महापालिकेने हे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील सीसी असलेल्या खाजगी ले-आउट मधील भूखंडांवर घरे बांधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.