बेळगाव लाईव्ह:आज 29 आगष्ट राष्ट्रीय खेळ दिना निमित्त बेळगावच्या जुन्या खेळाडूंनी मिळवलेले यश बेळगावातील जनतेला आणि होतकरू युवा खेळाडू अवगत करून देत आहोत .बेळगाव लाईव्ह युवा खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देत आलेले आहे मागील वर्षी अनेक खेळाडूंचा सत्कार केला होता यावर्षी जुन्या खेळाडू आठवण म्हणून त्यांनी घेतलेले परिश्रम मिळवलेले यश समोर ठेवत आहोत.
बेळगावच्या माती तयार झालेल्या बंडू पाटील व शंकर लक्ष्मण या दोन दिग्गज हॉकीपटूप्रमाणे कुस्तीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी नोंदवत एकेकाळी पै. मोहन रामचंद्र पाटील यांनी बेळगावचा झेंडा अटकेपार लावला.
कुस्तीमध्ये मोठा नावलौकिक मिळविणारे पै.मोहन रामचंद्र पाटील हे मूळचे बेळगावचे. त्यांचा जन्म 20 जानेवारी 1920 रोजी झाला आणि वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षीपासून त्यांनी कुस्तीचे धडे घेण्यास सुरवात केली. वडील कुस्तीपटू असल्याने ते बाल वयातच रोज आखाड्यात जात असत.
वडीलांचा हात धरून आखाड्यात जाणारे मोहन हळू हळू कुस्तीचा सराव करू लागले. त्यानंतर कालांतराने कुस्तीमध्ये तरबेज होत ज्यावेळी छातीवर ‘अशोक चक्र’ आणि मागच्या बाजूला ‘इंडिया’ लिहिलेला पोशाख परिधान करून ते कुस्तीच्या मॅटवर उतरले तेंव्हा त्यांचा ऊर अभिमान भरून आला होता. विदेशांतील विविध खेळाडू आणि प्रशिक्षकांकडून चांगला अनुभव घेत पुढे त्यांनी कुस्तीमध्ये ऊंच भरारी घेतली.
सकाळी दोन सत्रं आणि संध्याकाळी एक सत्र अशा तीन सत्रात पै मोहन पाटील मोहन यांचा कुस्तीचा सराव चालत असे. 1992 मध्ये बार्सिलोना ऑलिम्पिक, 1993 मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, 1992 मध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप (रौप्य पदक विजेता) आणि 1993, 1990 व 1994 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
तत्पूर्वी त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकून बेळगावचा नावलौकिक वाढविला. 1996 मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींनी पै. मोहन रामचंद्र पाटील यांना विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित केले होते.
1993 आणि 1994 मध्ये त्यांना एकलव्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. आजच्या कुस्तीपटुंनी अर्थात पैलवानांनी पै मोहन पाटील यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.