महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या 8 ऑगस्ट रोजी मराठा मंदिर येथील कार्यालयात पुन्हा एकीकरण समितीचे ऑफिसचे कामकाज सुरू केले जाणार आहे. यासंदर्भात मराठा मंदिर कार्यालय अध्यक्षांना एका निवेदनाद्वारे नुकतीच कल्पना देण्यात आली.
सदर निवेदन अध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी मराठा मंदिर व्यवस्थापकांकडे सुपूर्द करण्यात आले.
कांही वर्षांपूर्वी मराठा मंदिर येथे उद्घाटन केलेल्या कार्यालयातून सुरू झालेले म. ए. समितीचे कामकाज मध्यंतरी बंद झाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या गेल्या 30 जुलै रोजी झालेल्या बैठकीत आता या कार्यालयामध्ये पुन्हा समितीचे कामकाज सुरू करण्यासंदर्भात चर्चा करून एकमताने तसा ठराव संमत करण्यात आला आहे. पुन्हा एकदा चांगला रीतीने कार्यरत राहून सीमा भागातील मराठी जनतेची चांगली सेवा करता यावी आणि त्यासाठी मराठा मंदिर कार्यालय हे केंद्रस्थान रहावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्यामुळे सदर ठराव करण्यात आला.
त्याप्रमाणे आम्ही या लेखी पत्राद्वारे मराठा मंदिर व्यवस्थापन समितीला कळवू इच्छितो की महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालयासंबंधी त्वरित नियोजन करण्यासाठी जे कांही सहकार्य तुमच्याकडून आवश्यक आहे ते सर्व लवकरात लवकर केले जावे. त्यानुसार आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून पुढील रूपरेषा ठरवून वाटचाल करण्याची तयारी करणार आहोत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदनात माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी,रमाकांत कोंडूस्कर,शंकर बाबली महाराज,महादेव पाटील, सागर पाटील, गुणवंत पाटील यांच्या सह्या आहेत. उपरोक्त निवेदन सादर करण्याबरोबरच येत्या 8 ऑगस्टपासून मराठा मंदिर येथील आपल्या कार्यालयातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कामकाज सुरू होणार आहे.