बेळगाव लाईव्ह :नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता बेळगाव महानगरपालिकेमध्ये मराठी नगरसेवकांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करून देण्यात यावी अशी मागणी चारही मराठी नगरसेवकांनी महापौरांकडे केली आहे.
गुरुवारी उपरोक्त मागणीचे निवेदन महापौर शोभा सोमनाचे यांना सादर केले महापौराने निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले.
बेळगाव महापालिकेत चार मराठी भाषिक नगरसेवक आहेत. या चार मराठी नगरसेवकांसाठी महापालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष आवश्यक आहे.
आम्हा चार नगरसेवकांचा स्वतंत्र गट आहे. महापालिकेच्या कामकाजाच्या अनुषंगाने उठबस करणे, प्रभागातील नागरिकांची भेट व त्यांच्यासोबत चर्चा करणे, यासाठी स्वतंत्र कक्षाची गरज आहे. त्यामुळे आम्हाला महापालिका कार्यालयात स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचा तपशील महापौराना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठिंब्यावर केवळ चारच नगरसेवक निवडून आले होते. बेळगाव महापालिकेत एकेकाळी दबदबा ठेवणारी आणि अर्ध्याहुन अधिक नगरसेवक निवडून आणणाऱ्या महाराष्ट्रातील समितीला केवळ चार जागा मिळाल्याने आता स्वतंत्र कक्ष मिळवण्यासाठी देखील धडपड करावी लागतआहे हे बेळगाव येथील प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला बोचणारे आहे.
महापौर शोभा सोमानाचे या जरी भाजप पक्षाच्या राहिल्या तरी त्या मराठी भाषिक आहेत गेल्या बैठकीत महापौरांच्या नेतृत्वात मराठीतून परिपत्रक द्यावीत असा ठराव करण्यात आला होता मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. महापौरांनी पुढाकार घेऊन समितीच्या नगरसेवकांना समस्या सोडवण्यासाठी एक स्वतंत्र पक्ष देण्यासाठी तरी पुढाकार त्या घेतील का?मनपाच्या अधिकाऱ्यांना समितीच्या नगरसेवकांना कक्ष मिळावा यासाठी वजन टाकतील का हा महत्त्वाचा प्रश्न आहे?