दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने बैठकीत घेतला.
मंगळवारी (ता. 1) जिल्हा पंचायत सभागृहात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित पूर्वतयारी सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी नितेश पाटील होते.
या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सकाळी 9 वाजता जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी हे ध्वजारोहण करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यदिनी मंदिर आणि प्रार्थनास्थळांत विशेष पूजा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडांगणात स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि सर्वसामान्यांसाठी पुरेशी बसण्याची व्यवस्था करण्यात यावी. सर्व शासकीय इमारती विद्युत रोषणाईने उजळण्यात याव्यात, प्रत्येक विभागाने आपापल्या विभागात ध्वजवंदन केल्यानंतर जिल्हा क्रीडांगणावरील कार्यक्रमात सहभागी व्हावे. व्यापारी दुकाने विद्युत रोषणाईने सजवून उत्सवाचे वातावरण निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
लहान मुले व महिलांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्यासाठी बसची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकार्यांना दिले.पोलीस विभागाने परेडची तयारी करावी. त्याचप्रमाणे संध्याकाळी गंधर्व कलामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले.
प्लास्टिकच्या ध्वजांच्या वापरावर बंदी
प्लास्टिक ध्वज वापरण्यास मनाई आहे. त्यामुळे प्रत्येकाने खादी कापडी ध्वज वापरावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. तसेच सजावटीसाठी प्लॅस्टिकचे साहित्य वापरू नये. ज्या कागदाचा किंवा कापडाचा पुनर्वापर करता येईल त्याचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार अरविंद देशपांडे यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या नरगुंदकर भावे यांच्या सीपीडी मैदानाजवळील समाधीला आदरांजली वाहावी, अशी सूचना केली. त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकार्यांनी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
विकास कलघटगी यांनी प्लास्टिकच्या झेंड्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. श्रीनिवास ताळुकर यांनी किल्ला तलावात बुडणार्या महिलेला वाचवणार्या पोलीसाचा गौरव करावा, अशी मागणी केली. दलित नेते मल्लेश चौगले यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान राखावा, अशी विनंती केली.
या बैठकीला जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.