बेळगाव लाईव्ह :काकती (ता. जि. बेळगाव) येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखाना संचालकपदाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांच्या आज झालेल्या छाननीमध्ये सर्वच्या सर्व 55 इच्छुकांचे अर्ज वैध ठरले आहेत.
मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक होऊ घातली आहे. सदर संचालक पदाच्या 15 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल शनिवारी अंतिम तारीख होती. काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या 20 अर्जांसह निवडणुकीसाठी एकूण 55 इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व अर्जांची आज रविवारी छाननी झाली.
या छाननीमध्ये एकही अर्ज अवैध न ठरता सर्व 55 अर्ज वैध ठरले आहेत. आता उद्या सोमवारी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे आज सर्व अर्ज वैध ठरले असले तरी उद्या अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत समाप्त झाल्यानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. मार्कंडेय सहकारी साखर कारखाना संचालक पदाची निवडणूक येत्या 27 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत सामान्य विभागात 7 जागांसाठी तब्बल 27 जणांनी अर्ज केला आहे याशिवाय तर 2 महिलांच्या जागांकरिता 8 महिलांचे अर्ज दाखल झालेले आहेत.मागास ब ग्रुप च्या एका जागेसाठी तीन उमेदवारांचे अर्ज आले आहेत इतकेच काय तर अ गटाच्या एका जागेसाठी चौघांनी, अनुसूचित जमाती एका जागेसाठी तीन आणि अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत.इतक्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्या सोमवार 21 रोजी दुपारी अर्ज माघारीची शेवटची मुदत आहे त्याच्या अगोदर अर्ज माघारी झाल्यास बिनविरोध निवडणूक होऊ शकते अन्यथा 27 ऑगस्ट रोजी मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान होऊ शकते. एकूण बारा हजार सदस्य असेल तरी केवळ 2930 जणांना मतदानाचा अधिकार आहे त्यामुळे जर मतदान झाल्यास ही निवडणूक चुरशीची होऊ शकते.
मार्कंडेय सहकारी कारखान्याच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बिनविरोध निवड करण्यासाठी बैठकींचे सत्र सुरू असून उद्या दुपारपर्यंत बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत त्याला कितपत यश येते हे पाहावे लागणार आहे.