गृहज्योति योजनेसाठी बेळगाव जिल्ह्याला प्रतिवर्ष 516 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गॅरंटी योजनांद्वारे प्रति कुटुंब 4 ते 5 हजार रुपये खर्च केले जातील. हे पैसे मुलांचे शिक्षण आणि कुटुंबांच्या चरितार्थसाठी थोडक्यात स्वावलंबी बनण्यासाठी कामी आले तरच गॅरंटी योजना सार्थकी ठरणार आहेत, असे विचार सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आज शनिवारी सकाळी आयोजित राज्य सरकारच्या प्रति कुटुंब 200 युनिट मोफत विजेच्या “गृहज्योती” योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते गृहज्योती अंतर्गत शून्य वीज बिल आलेल्या लाभार्थींना त्यांच्या बिलाचे वाटप करण्यात आले.
निवडणुकीपूर्वी दिलेल्या गॅरंटी योजनांच्या आश्वासनाप्रमाणे आमच्या सरकारने तीन महिन्यात गृहज्योति योजना अंमलात आणली आहे. शक्ती योजना देखील अंमलात आणण्यात आली आहे. आता गृहलक्ष्मी, अन्नभाग्य आणि युवा निधी या योजना देखील लवकरच अंमलात आणल्या जातील. जनतेने या योजनांचा सदुपयोग करून घ्यावा, असे पालकमंत्री जानकीहोळी यांनी पुढे सांगितले.
गृह ज्योति योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 10 लाखाहून अधिक ग्राहकांना लाभ मिळवून देण्याचा विचार असून आत्तापर्यंत यापैकी 80 टक्के ग्राहकांनी या योजनेसाठी नांव नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन मुलांना चांगल्या प्रकारे सुशिक्षित केले जावे. मुले संत बसवेश्वरांची समानता आणि डॉ आंबेडकर यांच्या संविधानाचा आदर करतील असे संस्कार केले जावे तसे शिक्षण त्यांना दिले जावे.
आगामी काळात आमचे सरकार जनहितार्थ आणखी काही योजना अंमलात आणणार आहे. जनतेसाठीच्या योजनांवर सरकार मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करत असून हा पैसा जनतेचाच असल्यामुळे त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रमुख पाहुणे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार असिफ सेठ आदींनी समयोचित विचार व्यक्त केले. प्रारंभी हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता प्रवीणकुमार यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये मुख्य अभियंता व्ही. प्रकाश यांनी गृहज्योती योजनेबाबत थोडक्यात माहिती दिली. याप्रसंगी सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, हेस्कॉमचे मुख्य व्यवस्थापक सिद्धू हुल्लोळी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वमंगळ अरळीमट्टी यांनी केले.
गृह ज्योति योजनेच्या या शुभारंभ सोहळ्यास स्थानिक नगरसेवकांसह शहर आणि जिल्ह्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.