बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने दूध उत्पादकांना दुभती जनावर खरेदी करण्याकरिता दूध उत्पादक सोसायट्यांच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देण्यात येईल. यासाठी प्रत्येक सोसायटीला वार्षिक बिनव्याजी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले जाईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विवेकराव पाटील यांनी दिली.
महांतेशनगर येथील केएमएफ कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी आमदार भालचंद्र जारकीहोळी, केएमएफचे कार्यकारी संचालक कृष्णा व इतर उपस्थित होत विवेकराव पाटील म्हणाले की, दूध उत्पादनात बेळगाव जिल्हा हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र अलिकडे या जिल्ह्यातील हजारो जनावरे लंम्पीस्कीन रोगामुळे मृत्युमुखी पडली आहेत.
मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे तसेच लंम्पीस्कीन व अन्य चर्मरोगाच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीस काढल्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. जनावरे मृत्युमुखी पडल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही ही बिनव्याजी कर्ज देण्याची योजना आखली आहे.
या योजनेअंतर्गत जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या पशु विकास निधीमधून जिल्ह्यातील दूध उत्पादक सोसायट्यांना बिनव्याजी प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येईल. त्यानंतर या सोसायट्यांमार्फत त्यांनी निवडलेल्या शेतकऱ्यांना दुभती जनावर खरेदीसाठी 50 -50 हजार रुपये बिनव्याजी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जेणेकरून जिल्ह्यातील दूध उत्पादन पुन्हा पुर्ववत होण्यास मदत मिळणार आहे. कर्नाटकात पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात आला आहे. या कर्जाची परतफेड व्हावी यासाठी संबंधित सोसायटी, सोसायटीचे संचालक आणि कर्मचारी यांची कर्जाला सिक्युरिटी असेल. हा उपक्रम यशस्वी झाल्यास भविष्यात आम्ही यापेक्षा मोठे बिनव्याजी कर्ज दूध उत्पादक शेतकऱ्यांना देणार आहोत, असेही विवेकराव पाटील यांनी स्पष्ट केले.