बेळगाव लाईव्ह:टिळकवाडी येथील खानापूर रोड या दुपदरी मार्गाचे विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेले काँक्रिटीकरणाचे काम अद्यापही रखडत सुरूच आहे.
सध्या आरपीडी क्रॉसपासून गोवावेसपर्यंतच्या शहराच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याच्या अतिशय संथ गतीने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहन चालकांना मनस्ताप व त्रास सहन करावा लागत असून त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
टिळकवाडी येथील खानापूर रोडच्या दुपदरी मार्गाच्या मार्गापैकी आरपीडी क्रॉसपासून गोवावेसकडे शहराच्या दिशेने येणाऱ्या मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आरपीडी क्रॉस आणि गोवावेस सर्कलच्या ठिकाणी बॅरिकेड्स टाकून हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे गोवावेस रोटरी -मनपा स्विमिंग पूलसमोरील सर्कलकडे जाणारा शुक्रवार पेठेचा रस्ताही अडविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या दुपदरी खानापूर रोडच्या एका रस्त्यावरूनच दुतर्फा वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या कामामुळे आरपीडी क्रॉस आणि गोवावेस सर्कल येथील सिग्नल बंद ठेवण्यात आले आहेत.
परिणामी या दोन्ही ठिकाणी दोन्हीकडून ये-जा करणाऱ्या वाहनांची गर्दी होत असून विशेष करून आरपीडी क्रॉस येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
रस्त्याच्या कामामुळे एकाच मार्गावरून सुरू असलेली दुतर्फा वाहतूक आणि बंद असलेले सिग्नल लक्षात घेता उपरोक्त सर्कलच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रहदारी पोलिसांनी कार्यरत राहणे आवश्यक आहे.
तथापि उपरोक्त दोन्ही सर्कलच्या ठिकाणी रहदारी पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणाचे कष्ट घेतले जात नसल्यामुळे वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे गोवावेस सर्कलला जोडणारा शुक्रवार पेठ रस्ता अचानक बंद करण्यात आल्यामुळे पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेटकडून टिळकवाडीतील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ या मार्गांचा अवलंब करून गोवावेसकडे जाणाऱ्या रस्ता बंदची कल्पना नसलेल्या वाहन चालकांची देखील आज सकाळी गैरसोय झाली. त्यांना गोवावेस स्विमिंग पूलपर्यंत जाऊन पुन्हा माघारी परतत देशमुख रोड मार्गे आरपीडी क्रॉस गाठावा लागत होता.
एकंदर खानापूर रोडच्या अत्यंत संथ गतीने रखडत चाललेले काँक्रिटीकरणाचे काम समस्त वाहन चालकांसाठी मनस्ताप देणारे त्रासदायक ठरत आहे. तसेच सदर विकास काम शीघ्रगतीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.