बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने अंतिम सामन्यात हुबळी क्रिकेट अकॅडमी संघावर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवत धारवाड विभाग 16 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतर्फे (केएससीए) आयोजित धारवाड विभाग 16 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धा 2023 -24 नुकतीच यशस्वीरित्या पार पडली.
सदर स्पर्धेचा अंतिम सामना बेळगाव स्पोर्ट्स क्लब (बीएससी) आणि हुबळी क्रिकेट अकॅडमी यांच्यात खेळविला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून बीएससी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. हुबळी क्रिकेट अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना 39.3 षटकात सर्व गडी बाद 98 धावा काढल्या. त्यांच्या आदित्य खिलारे (30 धावा), कृष्णा पहुजा (18 धावा) आणि एमडी मोन मुल्ला (12 धावा) यांनी चांगली फलंदाजी केली.
बीएससी संघातर्फे नील पोवार याने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करताना 12 धावात सर्वाधिक 4 गडी बाद केले. त्याला सागर पाटील (17/2), सुरेंद्र पाटील (21/2) व अमर कुंदप (22/1) यांनी उत्तम साथ दिली.
हुबळी क्रिकेट अकॅडमीचे आव्हान यशस्वीरित्या झेलताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 34 षटकात अवघे 2 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठत 99 धावा झळकविल्या. त्यांच्या नील पोवार (28 धावा) आशुतोष हिरेमठ (25 धावा) आणि सुरेंद्र पाटील (25 धावा) यांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. हुबळी संघाच्या अमेय देसाई व अक्षय बैचवाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
या पद्धतीने बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 8 गडी राखून अंतिम सामना जिंकण्याबरोबरच स्पर्धेचे विजेतेपद हस्तगत केले. विजेत्या बीएससी संघाला क्लबचे संस्थापक प्रमुख अविनाश पोतदार, दीपक पवार, संगम पाटील, प्रमोद असलकर, विजय पाटील, विवेक पाटील, स्वप्निल येळवे व सोमनाथ सोमनाचे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे.