जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून त्याला मानवंदना देण्यासह पोलीस, गृह रक्षक दल, एनसीसी छात्र आदींच्या शिस्तबद्ध शानदार संचलनाद्वारे बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे आज 15 ऑगस्ट मंगळवारी सकाळी देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.
बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे आज नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर दिमाखदार स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित होते. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी नितेश पाटील शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच राष्ट्रगीताची धून वाजवून तिरंग्याला अभिवादन करण्यात आले. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी खुल्या जीपमधून परेडची पाहणी केल्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर पथसंंचालनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली.
पथसंचलनाच्या अग्रभागी जिल्हा पोलीस सशस्त्र दल (डीएआर) शहर तुकडी होती. त्या मागोमाग कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाची (केएसआरपी), केएसआरपी महिला तुकडी, शहर जिल्हा महिला पोलीस, नागरी पोलीस, डीएआर जिल्हा तुकडी, गृह रक्षक दल, जिल्हा अबकारी पोलीस, अरण्य खाते, अग्नीशामक, एनसीसी मुला मुली, भारत सेवा दल मुलींची तुकडी तसेच अगसगा हायस्कूल, अल्पसंख्यांक मोरारजी देसाई शाळा रामतीर्थनगर, महिला विद्यालय हायस्कूल, भरतेश हायस्कूल, प्रेशियस ब्लोझम स्कूल, बेसन इंग्लिश मीडियम स्कूल यमुनापूर, मराठा मंडळ इंग्लिश मीडियम हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल, माहेश्वरी अंध मुलांची शाळा अशा विविध शाळांच्या तुकड्यांचा पथसंचलनामध्ये सहभाग होता.
प्रमुख पाहुणे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम बेळगाव शहरासह जिल्ह्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी त्याग व बलिदान दिले त्यांचे स्मरण आज आपण सर्वांनी केले पाहिजे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा मार्गाने भारतीयांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना जगाच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. स्वातंत्र्य सेनानी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लाल बहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, बाळ गंगाधर टिळक आदी अनेक मान्यवरांचा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे बेळगाव जिल्हा देखील यामध्ये मागे नाही. वीर राणी कित्तूर चन्नम्मा, सेनापती संगोळ्ळी रायण्णा, कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे याखेरीज जिल्ह्यातील अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन खर्ची घातले हे लक्षात घेतले पाहिजे असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार अनेक जनहितार्थ योजना व कार्यक्रम राबवत आहे जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेल्या पाच गॅरंटी योजना आम्ही यशस्वीरित्या राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरात विविध विकास कामे हाती घेण्याबरोबरच नजीकच्या काळात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत उभारण्यात येईल असे सांगून आपल्या समायोजित भाषणात मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राज्य सरकारच्या शक्ती, अन्नभाग्य, गृहलक्ष्मी, गृहज्योती व युवा निधी या पाच महत्त्वाकांशी योजनांसह सरकारच्या अन्य विविध योजना आणि त्यासाठी खर्च केला जात असलेला निधी याबाबत माहिती दिली. स्वातंत्र्य दिन सोहळ्यास सरकारी आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बहुसंख्य देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.