बेळगाव लाईव्ह:सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेचे उद्घाटन बुधवार 30 रोजी म्हैसूर येथे होणार असून जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजारप्रमाणे 172 कोटी एकूण अनुदान जमा करण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी 11.30 वाजता हिरेबागेवाडी येथील शिवालय समुदायभवन आणि शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिरात महिला संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व लाभार्थ्यांसाठी म्हैसूर येथून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रत्येक ग्रामपंचायतीमधून 2000 लाभार्थी सहभागी होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक गावात कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी आणि ठिकठिकाणी कार्यक्रमाचे बॅनर प्रदर्शित करण्यात यावेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्सवाचे वातावरण निर्माण करा आणि प्रत्येक घरासमोर रांगोळी काढा, असे आवाहन जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी केले आहे.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्याच्या उद्देशाने दर महिन्याला महिला कुटुंबप्रमुखांच्या खात्यात दोन हजार रूपये जमा करण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात एकाच वेळी एकूण 500 ग्रामपंचायती आणि 39 स्थानिक स्वराज्य संस्थांत ही योजना सुरू करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण 11 लाख 87 हजार 469 महिला या योजनेच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असून आतापर्यंत 9 लाख 97 हजार 460 महिला कुटूंबप्रमुखांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 84 टक्के नोंदणी झाली आहे.