बेळगाव लाईव्ह :वर्षभरापूर्वी बिबट्या वाघाने बेळगावकरांची झोप उडविल्यानंतर आता एक कोल्हा शहरात दाखल झाला आहे. शास्त्रीनगर येथे आढळलेल्या या कोल्ह्यामुळे परिसरात घबराट पसरली असून वनखाते कोल्ह्याच्या मागावर आहे.
मनुष्याचे जंगलातील अतिक्रमण, तेथील झाडांची कत्तल परिणामी कमी होत चाललेले जंगल यामुळे अन्न पाण्याच्या शोधार्थ अलीकडच्या काळात अनेक वन्यप्राणी नागरी वसाहतींमध्ये शिरू लागले आहेत. बेळगावकरांसाठी वर्षभरापूर्वी बेळगाव रेस कोर्स मैदान परिसरात दाखल झालेला बिबट्या वाघ हे त्याचे उत्तम उदाहरण असतानाच आता शास्त्रीनगर सहावा क्रॉस येथे कोल्हा आढळून आला आहे.
चक्क शास्त्रीनगर सारख्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोल्हासारखा चतुर हिंस्र प्राणी आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होण्याबरोबरच संबंधित परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कांही धाडसी लोकांनी घराच्या परसदारी अन्नाच्या शोधार्थ फिरणाऱ्या या कोल्ह्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ देखील टिपला आहे.
दरम्यान याबाबतची माहिती मिळताच वनखात्याची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शास्त्रीनगर येथे धाव घेऊन कोल्ह्याचे शोध कार्य हाती घेतले आहे.
या शोध मोहिमेत श्रीराम सेना हिंदुस्तानचे कार्यकर्ते देखील वनखात्याला सहकार्य करत आहेत शास्त्रीनगर मधील कोल्ह्याचे आगमन सध्या कुतूहलपूर्ण चर्चेचा विषय झाला आहे.