बेळगाव लाईव्ह :व्रतवैकल्याचा महिना असलेल्या श्रावण मासाला प्रारंभ झाला आहे. श्रावणातील शुक्रवारच्या पूजेला विशेष महत्त्व असल्यामुळे आज शुक्रवारी महालक्ष्मी पूजनानिमित्त बाजारपेठेत फळे आणि फुलांना वाढती मागणी असून आवक घटल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे.
श्री लक्ष्मी पूजेसाठी शहर परिसर तसेच उपनगरातील प्रमुख बाजारपेठेत फळे आणि फुलांची खरेदी करण्यासाठी काल गुरुवारपासून महिलांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या बाजारपेठेत गुलाब, झेंडू, शेवंती, गलाटा, आघाडा, मोगरा वगैरे फुलांसह केळी, सफरचंद, मोसंबी, पपई, अननस, सीताफळ या फळांच्या दरात देखील वाढ झाली आहे.
बेळगावच्या होलसेल फुलांच्या मार्केटमध्ये शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागासह बागलकोट, बेंगलोर धारवाड येथून विविध फुलांची आवक होत आहे. श्रावणात राज्यात फुलांना मोठी मागणी असल्याने बेळगाव बाजारपेठेत आवक कमी होऊन दरात वाढ झाल्याचे समजते.
बेळगाव बाजारपेठेत फुलांचा प्रति किलो दर पुढील प्रमाणे आहे. शेवंती -100 ते 150 रु., गुलाब -200 ते 220 रु., निशिगंध -100 ते 120 रु., अन्य फुले -50 ते 60 रु., झेंडू प्रति गुंफा -10 ते 20 रुपये. त्याचप्रमाणे फळांचे दर प्रति किलो पुढील प्रमाणे आहेत. सफरचंद -120 ते 150 रु.,
मोसंबी -80 ते 100 रु., चिक्कू -100 ते 140 रु., पपई -50 ते 60 रु., अननस -80 ते 100 रु., संत्री -210 ते 230 रु., साधी केळी डझन -50 ते 60 रु., जवारी केळी डझन -80 ते 90 रुपये. यंदा बेभरवशाच्या पावसामुळे फुलांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. परिणामी त्यांची कमी झालेली आवक आणि फळांची मागणी वाढल्याने दर वाढ क्रमप्राप्त झाल्याचे व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे.