Thursday, December 26, 2024

/

कधी पूर्ण होणार आशा कार्यकर्त्यांच्या मागण्या

 belgaum

खाजगीकरणाच्या निषेधार्थ तसेच आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या (सीआयटीयू) नेतृत्वाखाली अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण, शेतकरी विरोधी धोरण, मणिपूर येथे महिलांवर होत असलेला अन्याय अत्याचार याच्या निषेधार्थ कर्नाटक प्रदेश रयत संघ (केपीआरएस) व कर्नाटक प्रदेश कृषी कुलिकार संघ (एआयएडब्ल्यू सी) यांनी सीआयटीयूच्या आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. सदर मोर्चाद्वारे पंतप्रधानांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकाने निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरेने पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या सीआयटीयुच्या मोर्चात बेळगाव शहरासह जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या तसेच संबंधित अन्य महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मोर्चादरम्यान खाजगीकरण आणि शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा धिक्कार करणाऱ्या घोषणा देण्यात येत होत्या. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचा लाल बावटा असणारा ध्वज हातात फडकवण्यासह निदर्शने करत निघालेल्या मोर्चातील महिला कार्यकर्त्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.Asha protest

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रसिद्धी माध्यमांची बोलताना सीआयटीयुच्या बेळगाव तालुका अध्यक्षा मंदा नेवगी म्हणाल्या की, मणिपूर येथे महिलेची विवस्त्र धिंड काढून तिच्यावर अत्याचार केले जातात तरीही आमचे पंतप्रधान अद्यापही गप्प का? तेथील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अच्छे दिन आणण्याचे आश्वासन दिले होते मात्र तसे काहीच घडलेले नाही गरीब गरीबच आणि श्रीमंत श्रीमंतच होत चालला आहे.

अंबानी अंबानी सारख्या उद्योगपतींचे कर्ज सरकार माफ करते त्याउलट सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करून अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी मधील स्वयंपाकी महिलांना रस्त्यावर आणण्याचे काम केले आहे आम्हाला न्याय मिळवून द्या अन्यथा खुर्ची सोडा अशी टीका माधुरी नेवगी यांनी केली आहे.

राष्ट्रीय महिला फेडरेशनचे पंतप्रधानांना निवेदन

मणिपूर येथे महिलेची विवस्त्र धिंड काढून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसह अन्य विविध मागण्या नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन फेडरेशनच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे पंतप्रधानांकडे करण्यात आल्या आहेत.

नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन फेडरेशनच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून उपरोक्त मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याची आश्वासन दिले. मणिपूर येथे महिलेची विवस्त्र दिंड काढून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या समाजकंटक गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी. हरियाणा येथील दोन समुदायांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला आळा घालावा. बेळगाव जिल्हासह कर्नाटक आणि अन्य राज्यात वाढलेली सायबर गुन्हेगारी रोखावी. रोजगार योजनेअंतर्गत काम करणाऱ्यांची नावे नोंदविली जात असली तरी त्यांना पगार व अन्य सुविधा मिळत नाहीत याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा आशयाच्या मागण्या पंतप्रधानांना धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.

निवेदन सादर करतेवेळी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन फेडरेशनच्या (एनएफआयडब्ल्यू) जिल्हाध्यक्षा कला सातेरी, सेक्रेटरी कला कार्लेकर, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य मीना मादार, कायदा सल्लागार मंजुषा माने, शोभा खनगाव, जुलिया बाळेकुंद्री आदींसह संघटनेच्या बहुसंख्य महिला सदस्या उपस्थित होत्या.