बेळगाव लाईव्ह:निजलिंगप्पा साखर संस्थेला देऊनही अद्याप वापराविना पडीक असलेली बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) येथील जमीन गायरान अथवा शैक्षणिक कार्यासाठी गावाच्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी बेळगुंदीवासियांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगुंदी गावकऱ्यांनी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याची आश्वासन दिले आहे.
आपल्या मागणी संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना मृणाल हेब्बाळकर म्हणाले की, गेली 19 वर्षे झाली बेळगुंदी येथील सुमारे 20 -25 एकर जमीन निजलिंगप्पा साखर संस्थेला उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र सदर संस्थेने आजतागायत त्या जमिनीचा कोणत्याही प्रकारे वापर केलेला नाही. आता त्या जमिनीत एक प्रकल्प सुरू करण्याचा निजलिंगप्पा साखर संस्थेचा विचार आहे. तथापि याला बेळगुंदीसह परिसरातील सर्व गावकऱ्यांचा विरोध आहे. संबंधित जमिनीचा वापर शैक्षणिक कार्यासाठी म्हणजे शाळा अथवा महाविद्यालय उभारण्यासाठी केला जावा अशी गावकऱ्यांची मागणी असल्याचे सांगून बेळगाव ग्रामीण मतदार संघ विकासाच्या बाबतीत मागे पडला आहे.
यासाठी मुलांना शिक्षण आणि तरुणांना रोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने संबंधित जमीन शैक्षणिक कार्यासाठी वापरण्यास द्यावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे, असे हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
बेळगुंदी येथील सर्व्हे नं. 303, 305, 306 मधील जमीन गेल्या 2003 -04 साली तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निजलिंगप्पा साखर संस्थेला वापरण्यास दिली होती. मात्र सदर संस्थेने त्यानंतर या जमिनीचा वापरच केला नसल्यामुळे ती गेली 19 वर्षे पडीक आहे. आतापर्यंत त्या जागेचा कोणत्याही पद्धतीने विकास झालेला नाही. सदर जमीन गावाला मिळावी यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. ती जमीन बेळगुंदी गावाला गायरानासाठी किंवा शैक्षणिक कार्यासाठी वापरण्यास द्यावी अशी आमची मागणी आहे. मात्र अद्यापपर्यंत आमच्या मागणीची पूर्तता करण्यात आलेली नाही.
त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत, अशी माहिती सुरेश किणेकर व शिवाजी रामू बोकडे या गावकऱ्यांनी बेळगाव लाईव्हला दिली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यास बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.