बेळगाव लाईव्ह:सरकारच्या विविध योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात यावी. निर्धारीत वेळेत सर्व खात्यांनी दिलेले उद्दीष्ट पार करावे. योजनांसंदर्भात व्हॉसटअॅप, फेसबुक या समाज माध्यमांतून जागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी विकास आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पाटील बोलत होते.
महिला आणि बाल विकास खात्याने यापूर्वीच उद्दीष्ट पूर्ण केले आहे. मत्स्य खात्याने अल्पसंख्याकांच्या विविध योजनांची पूर्तता करणे आवश्यक होते. त्यामुळे अधिक लाभार्थ्यांची निवड करून अंमलबजावणी करण्यात यावी.
रेशीम खात्याकडून देण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये 70 टक्के सबसिडी देण्यात येते. पण, कामाच्या अहवालानुसार केवळ 20 टक्केच लाभार्थीच मिळाले आहेत. त्यामुळे विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात यावी. झोपडपट्टी निर्मूलन मंडळाकडून गेल्या वर्षात 60 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
आरोग्य खाते, जिल्हा पंचायत, बागायत खाते यासह विविध खात्यांच्या योजनांबाबत कोणताही विलंब करण्यात येऊ नये. पोलिस खात्याकडून समाज माध्यमांतून माहिती देण्यात येत आहे. जागृती करण्यात येत आहे. तशा प्रकारे सर्व खात्यांच्या अधिकार्यांनी समाज माध्यमांतून जागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी केल्या.
महापालिका उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, जिल्हा पंचायत मुख्य योजना संचालक गंगाधर, अल्पसंख्याक विकास खात्याचे उपसंचालक अब्दूल रशिद मिर्चण्णावर, पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर, बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड आदी उपस्थित होते.