बेळगाव महापालिकेकडून शहरात प्लास्टिक बंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून आज मंगळवारी विविध आस्थापनं आणि दुकानांवर छापा टाकून महापालिकेच्या पथकांनी 550 किलो प्लास्टिक जप्त केले आहे.
महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पुन्हा प्लास्टिक बंदी आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज शहर विविध ठिकाणी दुकाने व आस्थापनांवर छापे टाकून सुमारे 550 किलो प्लास्टिक जप्त करण्या बरोबरच 44 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
महानगरपालिकेचे 14 आरोग्य निरीक्षक आणि दोन पर्यावरण अभियंत्यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता हनुमंत कलादगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. केंद्र शासनाच्या आदेशानुसार शहरातील 3 ते 28 जुलै या काळात प्लास्टिक मुक्त शहर अभियान राबविण्यात आले होते.
हे अभियान पूर्ण झाले असले तरी एकल वापर प्लास्टिक बंदी बेळगाव कायम राहणार आहे. सदर प्लास्टिक बंदी आदेशाची अंमलबजावणी महापालिकेकडून सुरू झाल्यामुळे शहरातील प्लास्टिक विक्रेते व प्लास्टिकचा वापर करणाऱ्या आस्थापनांचे मालक धास्तावले आहेत.