बेळगाव लाईव्ह :स्थानिक प्रशासनामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा या उद्देशाने बेळगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिक प्रभाग समित्या (सिटीझन्स वॉर्ड कमिटी) स्थापन करण्यात येणार आहे. तरी आपापल्या प्रभागातील सदर समितीचा सदस्य होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी येत्या मंगळवार दि. 29 ऑगस्टपर्यंत बेळगाव महापालिका अथवा बेळगाव सिटीझन्स वॉर्ड कमिटी बळगकडे अर्ज करावेत, असे आवाहन बेळगाव सिटीझन्स वॉर्ड कमिटी बळगने केले आहे.
कर्नाटक महानगरपालिका कायदा 1976 नुसार बेळगाव महापालिकेकडून अधिकृत नागरिक समिती म्हणून प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये 10 नागरिकांचा समावेश असेल जे आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी मदत करण्याबरोबरच महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या सचिवाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहतील. बेळगाव सिटीझन्स वॉर्ड कमिटी बळगच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांना स्थानिक प्रशासनामध्ये सक्रिय सहभाग असावा यासाठी नागरी प्रभाग समित्या (सिटीझन्स वार्ड कमिटी) स्थापन करण्याची संकल्पना 1990 साली अस्तित्वात आली. त्यानंतर 1992 मध्ये भारताच्या संसदेने नगरपालिका कायद्याला मंजुरी दिली. नागरिकांनी विशेष करून शहरातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनात सक्रिय सहभाग दर्शवावा मंजुरी दिल्यामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आली.
मात्र आता याला 30 वर्षे होऊन गेली तरी देशभरातील कोणत्याही शहरांमध्ये सिटीझन्स वॉर्ड कमिट्या अस्तित्वात नाहीत. कर्नाटक राज्याने 2011 मध्ये यासंदर्भात केंद्राच्या अनुमतीने पुढाकार घेतला आणि 2011 मध्ये तसा कायदा तयार केला. या कायद्यामध्ये 2016 मध्ये कांही दुरुस्त्या करण्यात आल्या. पुढे 2019 मध्ये या कायद्याला धरून काही नियम तयार करण्याबरोबरच सरकारी राजपत्रात त्याची नोंद करण्यात आली. त्यानुसार मागील वर्षी केंद्र सरकार व अन्य राज्य सरकारच्या मदतीने कार्यरत असलेल्या जनाग्रह या बिगर सरकारी संघटनेच्या सहकार्याने कर्नाटक सिटीझन्स वॉर्ड कमिटी बेळग या संघटनेची स्थापन करण्यात आली. राज्यातील 11 शहरांमध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. कर्नाटक सिटीझन्स वॉर्ड कमिटी बेळगची बैठक अलीकडेच बेंगलोर येथे पार पडली. या पार्श्वभूमीवर बेळगाव सिटीझन्स वॉर्ड कमिटी बळग या संघटनेची देखील स्थापना करण्यात आली असून जी केल्या एक -दीड वर्षापासून सक्रिय आहे. या संघटनेने शहरात नागरिकांचा सहभाग असलेल्या प्रभाग वार समित्या स्थापन केल्या जाव्यात यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, प्रादेशिक आयुक्त, विद्यमान महापौर, उपमहापौर अशा सर्वांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या 9 ऑगस्ट रोजी त्या संदर्भात आता अधिकृत नोटिफिकेशन अर्थात सूचना जारी केली आहे. सदर सूचनेनुसार येत्या 29 ऑगस्टपर्यंत शहरातील नागरिक आपापल्या भागातील सिटीजन्स वॉर्ड कमिटी अर्थात नागरिक प्रभाग समितीच्या सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतात.
तरी सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांच्यासाठी बेळगाव महापालिकेमध्ये संबंधित अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी अधिक माहिती आणि अर्जासाठी त्यांनी बेळगाव सिटीझन्स वॉर्ड कमिटी बळगचे निमंत्रक अनिल चौगुले यांच्याशी संपर्क साधावा. या संघटनेचा व्हाट्सअप ग्रुप देखील असून इच्छुकांनी त्याचे सदस्य बनावे. सध्या संघटनेची 15 जणांची समन्वय समिती देखील आहे.
बेळगाव सिटीझन्स वॉर्ड कमिटी बळगतर्फे प्रभाग मित्र देखील गोळा केले जात आहेत, अशी माहिती बळगच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच बेळगाव शहर सुधारणेच्या चळवळीला पाठिंबा देऊन त्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन बेळगाव सिटीझन्स वॉर्ड बळगने केले.