राज्यातील मागील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ लागू केलेल्या योजना रद्द करून विद्यमान काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी संबंधित योजना तात्काळ पूर्ववत लागू कराव्यात अन्यथा भाजप रयत मोर्चाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देताना आज सोमवारी माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर कडाडून टीका केली.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. गेल्या दोन महिन्यापासून राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेवर विशेष करून देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला जात आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंमलात आणलेल्या योजना तसेच मागील भाजप सरकारच्या कालावधीत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा आणि बसवराज बोम्मई यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लागू केलेल्या योजना विद्यमान सरकारने रद्द केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. यासाठी आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षातर्फे जिल्ह्यात आंदोलन हाती घेतले आहे.
देशाचा कणा आणि अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आजतागायत सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांनी फक्त मोठमोठ्या बाता करून आश्वासने घेण्यापलीकडे कांही केलेले नाही.
आज आपला देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली आहेत आणि आपल्या सर्वांच्या सुदैवाने पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आपल्याला लाभले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान सन्मान योजना लागू केली. अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना थोडे आर्थिक सहाय्य व्हावे यांचे जीवन सुसह्य व्हावे त्यांच्यावर कर्ज वगैरे घेण्याची वेळ येऊ नये, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन टप्प्यात दोन हजार रुपये प्रमाणे 6 हजार रुपये तर मागील भाजप सरकारकडून दोन टप्प्यात 4 हजार रुपये अर्थसहाय्य केले जात होते.
या पद्धतीने तत्कालीन भाजप सरकार आपल्या परीने थोडीफार मदत शेतकऱ्यांना करत होते. मात्र राज्यातील विद्यमान सरकारने आपल्याकडून दिला जाणारा 4 हजार रुपयांचा निधी बंद केला आहे. परिणामी दरवर्षी 10 हजार रुपये मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आता फक्त 6 हजार रुपये मिळणार आहेत. हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे. आमच्या पक्षातर्फे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रयत विद्यानिधी ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असणारी शिष्यवृत्ती योजना सुरू केली कर्नाटकाच्या इतिहासात अशा पद्धतीची ही पहिलीच योजना आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगले शिकून उत्तम नावलौकिक मिळवावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 11 लाख शेतकरी कुटुंबांसाठी सुमारे 438.69 कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर केला आहे. मात्र विद्यमान सरकारने ही योजना रद्द केली आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो असे स्पष्ट करून पाटबंधारे योजना एपीएमसी कायदा या संदर्भात विद्यमान सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्याय संदर्भात माजी मंत्री मंत्री शशिकला जोल्ले यांनी माहिती दिली.
त्याचप्रमाणे वीज दरवाढ, गोशाला उभारणी योजना, भू सिरी योजना, श्रमशक्ती योजना, जीवन ज्योती जीव विमा योजना, रयत संपद योजना, सहस्त्र सरोवर सह्याद्री सिरी योजना, मत्स्यपालन आदी योजना संदर्भात विद्यमान काँग्रेस सरकारने केलेल्या अन्यायाची माहिती देताना मंत्री शशिकला जोल्ले यांनी काँग्रेस सरकारवर कडाडून टीका केली. तसेच शेतकऱ्यांच्या हितार्थ मागील भाजप सरकारने लागू केलेल्या योजना पूर्वत अंमलात न आणल्यास राज्यभरात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेस भाजप नेते महांतेश कवटगीमठ, महिला नेत्या उज्वला बडवानाचे आदी नेतेमंडळींसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.