अलीकडे शहर परिसरातील चोऱ्या -घरफोड्या यासारख्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून सध्या रात्री -अपरात्री विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणाऱ्या रोमिओंमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.
गेल्या कांही दिवसांपासून शहर उपनगर आणि ग्रामीण भागात चोऱ्या -घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून रात्री 12 वाजल्यानंतर विविध ठिकाणी पोलीस गस्त सुरू झाली आहे.
त्याचप्रमाणे संशयास्पदरित्या फिरणाऱ्या वाहन चालकांना रोखून त्यांची विचारपूस करण्याबरोबरच ठोस कारण नसल्यास संबंधितांची चौकशी केली जात आहे. तसेच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पाहण्यासाठी बायोमेट्रिक मशीनवर थम्ब अर्थात त्यांचा अंगठा घेतला जात आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळून आल्यास संबंधितांना ताब्यात घेण्यासह वाहने जप्त केली जात आहेत. त्यामुळे रात्री -अपरात्री विनाकारण रस्त्यावर फिरणारे रोड रोमिओ धास्तावले आहेत.
पोलिसांना देण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे एखाद्याचा थम्ब घेतल्यास अवघ्या कांही सेकंदात त्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांना समजणार आहे.