बेळगाव लाईव्ह :एखाद्या गावाचं नाव मोठे होते ते त्या गावातल्या माणसांच्या कर्तुत्वावर, बेळगावातील अश्या कर्तुत्व वान व्यक्तींनी देश विदेशात आपल्या बेळगावचा झेंडा रोवला. त्यांच्या कार्याची बेळगाव लाईव्ह ने घेतलेली दखल म्हणजेच ‘ समुद्रापार बेळगाव ‘
एखाद गाव एखाद्या ठिकाणी वसतं म्हणजे त्या भूमी पटलावर आपल्या कर्तुत्वाने आपल्या जगण्या बरोबर इतरांच्या जगण्यातही आपला सहभाग नोंदवणे.
बेळगावच्या जनतेने सातासमुद्रापार आपल्या प्रगतीचे झेंडे रोवले आहेत. विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करून बेळगाववासीयांनी बेळगावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, संस्कृती, वैद्यकीय, फॅशन यासह अनेक क्षेत्रात कामगिरी बजावून आपल्यासह बेळगावचे नावही उंचावले आहे.
आजच्या घडीला बेळगावमधील हजारो नागरिक विदेशात नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. आपल्या भारतीय बुद्धिमत्तेचा डंका ते विदेशात गाजवत आहेत. बेळगावचे नाव विदेशात राहून उंचावणाऱ्या परदेशातील बेळगावकरांच्या प्रगतीची, त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून दर रविवारी त्यांच्या कार्याची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
सुरुवातीचा काळ असा होता, कि केवळ सरकारी नोकरी किंवा मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून राज्या बाहेर किंवा परदेशात प्रयाण केलं जायचं! पूर्वीच्या काळी अशाच पद्धतीची अनेकांची मानसिकता होती. मात्र आता जग पुढारले आहे. परिस्थिती बदलली आहे.
आधीच्या काळातल्या मानसिकतेला छेद देत प्रत्येकाच्या कार्याचा आवाका वाढत चालला आहे. क्षेत्र विस्तारले आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हजारो जण परदेशातही भारताचे आणि पर्यायाने बेळगावचेही नाव गाजवत आहेत. बेळगावकर देशाच्या कानाकोपऱ्यात आपले कार्यक्षेत्र वाढवत आहेत. वैद्यकीय, ऑटोमोबाईल, संगणक, वैज्ञानिक अशा अनेक क्षेत्रात बेळगावकर परदेशातही यश कमावत आहेत.
‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून ‘समुद्रापार बेळगाव’ या नव्या सदराच्या माध्यमातून परदेशातील बेळगावकरांची ओळख करून देण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सदरासाठी माहिती देण्याकरिता बेळगाव लाईव्ह, ९४४८३५१८१६ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.